डिप्पी वांकाणी,
ऑनलाइन लोकमत, मुंबई
एका महिन्यापूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दत्तात्रय पडसलगीकर यांनी पहिली मुलाखत दिली ती ऑनलाइन लोकमतला. या मुलाखतीत पडसलगीकरांनी शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीची माहिती तर दिलीच, त्याशिवाय दहशतवादाकडे ओढल्या जात असलेल्या तरुणांना कट्टर होण्यापासून रोखण्यासाठी मुंबई पोलीसांनी केलेल्या उपायांची माहिती दिली. नैतिक पोलीसगिरीविषयीही त्यांनी आपली मतं मोकळेपणानं मांडली. या मुलाखतीतले मुख्य मुद्दे:
लोकमत - तुम्हाला पदभार स्वीकारून एक महिना झालाय. मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचे प्राधान्यक्रम काय आहेत?
पडसलगीकर - सर्व स्तरांवरच्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आहे. तसेच, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जिथं माजी माणसं काम करतात, त्या क्षेत्रीय पोलीस ठाण्यांनाही मी भेटी दिल्यात. त्यांनी कायम सतर्क रहावं अशा सूचना मी त्यांना दिल्या आहेत. माझे पोलीस अधिकारी कुठल्याही प्रकारची स्थिती हाताळण्यास सक्षम आहेत, याबद्दल माझी खात्री पटली आहे. याव्यतिरिक्त, पोलीस आणि नागरिकांचे संबंध सुधारावेत, तसेच पोलीसांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात याकडेही मी लक्ष देत आहे.
लोकमत - पोलीसांच्या सोयी सुविधा तुम्ही म्हणत आहात, तर त्या दृष्टीने पोलीसांचं मनोबल उंचावण्यासाठी तुम्ही कुठल्या उपाययोजना करत आहात?
पडसलगीकर - पोलीसांचं आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा व काळजी घेण्याचा विषय आहे. पोलीसांठी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा शिबिरांमध्ये पोलीसांना आधीपासून सतावणाऱ्या शारिरीक व्याधींचा तपास करता येईल. तसेच, ताणतणावाचं नियोजन कसं करावं यासाठीही शिबिरांचं आयोजन आम्ही लवकरच करणार आहोत.
लोकमत - जेएनयूमध्ये कन्हैय्या कुमारला अटक झाल्यानंतर मुंबईसह देशभरात विविध ठिकाणी निदर्शने झाली. याचा तुम्ही कसा सामना केलात. त्यासंदर्भात तुम्हाला काही धागेदोरे मिळाले आहेत का?
पडसलगीकर - आम्ही फक्त शैक्षणिक संस्थांच्या बाहेर होणाऱ्या अशा निदर्शनांवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही अशा संस्थांमध्ये अजून गेलेलो नाहीत. आम्ही फक्त कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या निदर्शनांकडे लक्ष ठेवून आहोत आणि त्यांच्या संदर्भातली गुप्त माहिती वा धागेदोरे गोळा करत नाहीयोत.
लोकमत - हेडलीनं त्याच्या पाकिस्तानमधल्या हँडलर्ससंदर्भात नुकतीच माहिती दिली, परंतु अनेक जण असं सांगतात की या माहितीला काही अर्थ नाही कारण ती पडताळून बघता येत नाही. तुमच्यामते हेडलीची साक्ष किती महत्त्वाची आहे.
पडसलगीकर - हेडलीच्या साक्षीला निश्चितच महत्त्व आहे. कारण ती न्यायालयासमोर झाली आहे. असं याआधी कधीही झालं नव्हतं.
लोकमत - मुंबई पोलीस सध्या टिवटर हँडलवर अॅक्टिव आहेत. पण, तिथं संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत, अनेकजण पोलीस भ्रष्टाचारी असल्याचंही तिथं नोंदवतात. अशा प्रतिक्रिया आल्यावरही हे कँपेन तुम्ही सुरू ठेवणार आहात?
पडसलगीकर - निश्चितच हे कँपेन सुरू राहणार. माझ्या कारकिर्दीत माजा प्रयत्न असेल की, नकारात्मक प्रतिक्रियांचं प्रमाण कमी होईल आणि चांगलं कार्यक्षम पोलीसाचं चित्र उभं राहील.
लोकमत - अनेक तरुणांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढलं जात आहे. त्यांना दहशतवादापासून रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत ?
पडसलगीकर - मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर राहिली आहे. एटीएसच्या सहाय्याने आम्ही प्रयत्न करत आहोत, आणि यात आमची स्पेशल ब्रांच अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत. पोलीस ठाण्यातील अधिका-यांना धार्मिक नेत्यांच्या संपर्कात राहण्यास सांगितलं आहे जे तरुणांना दहशतवादाकडे ओढल्या जाण्यापासून परावृत्त करतील. लवकरच आम्ही एक नवी संकल्पना अंमलात आणू ज्यामध्ये तरुण थेट आमच्या संपर्कात असतील. आम्ही त्यांचा आत्मविश्वास वाढवू आणि त्यांना दहशतवाद कसा चुकीचा आहे याबद्दल शिक्षण देऊन जागृत करु.
लोकमत - मुंबई पोलिसांवर नैतिक पोलीसगिरी केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तुम्ही याकडे कसं पाहता ? आणि तुमच्या सहका-यांना यासंबंधी तुम्ही काय सूचना केल्या आहेत ?
पडसलगीकर - नैतिक पोलीसगिरीसंबंधी माझ्या माणसांना मी कडक सूचना केल्या आहेत. लोकांशी नम्रपणे वागण्याची तसंच कोणाचीही खासगी बाब भंग होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना दिली आहे. छापा टाकताना काळजी घेण्याचे आदेशही दिले आहेत.
लोकमत - मुंबई पोलिसांना मिळणारी शस्त्र, आधुनिक साहित्य, सुविधांची माहिती तुम्ही घेतली आहे का ? मुंबई पोलिसांना गरज आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे अशा काही गोष्टी आहेत का ?
पडसलगीकर - सरकारकडे आम्ही अनेक प्रस्ताव दिले आहेत आणि त्या गोष्टी आम्हाला पुरवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.सद्यस्थितीला आमच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही आहे.