- जिया आत्महत्या प्रकरण
मुंबई : जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सीडीआर जमा न केल्याची माहिती सीबीआयने शुक्रवारी विशेष महिला न्यायालयाला दिली. तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला तेव्हा आत्महत्येला १८ महिने पूर्ण झाले होते आणि सेवा पुरवणाऱ्या कंपन्या १८ महिन्यांनंतर माहिती ठेवत नाहीत, अशी माहिती सीबीआयने विशेष न्यायालयाला दिली.सीबीआय व जुहू पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले कागदपत्रे आणि काही वस्तू न्यायालयापुढे सादर केल्या. जिया खानची आई राबिया खानने खटल्यादरम्यान सरकारी वकिलांना मदत करण्यासाठी मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. जियाची हत्या झाली नसून तिने आत्महत्या केली, हा सीबीआयचा निष्कर्ष जियाच्या आईला मान्य नाही. तिची हत्या करण्यात आली असून, सूरज पांचोलीच याला जबाबदार आहे, असे जियाच्या आईचे म्हणणे आहे. यावरून तिने उच्च न्यायालयातही धाव घेतली. उच्च न्यायालयाने सध्या खटल्याला स्थगिती दिली आहे. (प्रतिनिधी) -जुहू पोलिसांनी जियाच्या मृत्यूवेळी तिच्या अंगावर असलेल्या सर्व वस्तू व दुपट्टा न्यायालयापुढे सादर केला. तर सीबीआयने या खटल्यात साक्षीदार असलेल्या सूरजच्या मित्रांचे सीडीआर मिळत नसल्याची माहिती विशेष न्यायालयाला दिली. सीबीआयने ३२ वस्तू न्यायालयापुढे सादर केल्यानंतर न्यायालयाने या केसची पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी ठेवली.