नागपूर/मुंबई - गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांविरोधात एनसीबीकडून व्यापक प्रमाणात कारवाई सुरू आहे. यामध्ये सिनेजगताशी संबंधित काही व्यक्तींवरही ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात सुरू असलेल्या कारवायांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी 27 कोटी रुपयांचे हेरॉईन पकडले होते पण त्यात हिरोईनचा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
नागपूर प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए विभाग आणि वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. या प्रसंगी गृहमंत्री वळसे पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थविरोधी कारवाईचे पेव फुटले आहे. जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रात आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहेत. तसेच केंद्रातील तपास युनिटच ते शोधू शकते. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे हेरॉईन पकडले होते, पण त्यात हिरोईनचा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही. महाराष्ट्र पोलीस मजबूत आहेत आणि अनेक मोठ्या कामगिरी केल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांची ही ख्याती बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
दरम्यान, गुन्ह्याला वाचा आणि गुन्हेगाराला सजा देण्यासाठी या प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळामुळे गुन्ह्यांचा तपास करण्याला वेग येईल आणि पुढे होणाऱ्या शक्ती कायद्याला बळकटी मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.