मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हटलं की भरधाव वेगानं धावणाऱ्या गाड्यार डोळ्यासमोर दिसू लागतो. आता या महामार्गावरील प्रवास आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे. एक्स्प्रेस वेवरील वेगमर्यादा वाढवण्याचा विचार एमएसआरडीसीकडून सुरू आहे. एक्स्प्रेस वेवरील वेगमर्यादा वाढवल्यास राज्याच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक राजधानी यांच्यातील अंतर अर्ध्या तासानं कमी होईल. एमएसआरडीसीकडून वेगमर्यादा वाढवण्याचा विचार सुरू असला तरी यंत्रणांकडून अपघातांचाही विचार केला जात आहे. 2003 मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत या 95 किलोमीटरच्या महामार्गावर 5 हजार अपघात झाले आहेत. एक्स्प्रेस वेवरील वेगमर्यादेचा निर्णय घेण्यासाठी एमएसआरडीसीनं एका समितीची स्थापना केली आहे. यामध्ये गृह, वाहतूक, ऑटोमोबाईल, आरोग्य क्षेत्रातील तज्ञांसह एमएसआरडीसीमधील अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्याकडून वेगमर्यादेबद्दलचा अहवाल तयार करण्यात येईल. यानंतर एक्स्प्रेस वेसाठीची नवी वेगमर्यादा निश्चित केली जाईल. वेगमर्यादेबद्दलचा निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेली समिती महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र, अरुंद भाग यांचा विचार करेल. येत्या काही महिन्यांमध्ये या समितीकडून अहवाल सादर केला जाईल. वेगमर्यादा वाढवायची असल्यास अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक असतील, याची माहितीदेखील समितीकडून दिली जाईल. एप्रिल महिन्यात केंद्रानं महामार्गांची देखभाल करणाऱ्या सर्व यंत्रणांना वेगमर्यादा वाढवण्याची विनंती केली आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा, या उद्देशानं केंद्राकडून ही विनंती करण्यात आली आहे. मात्र वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अद्याप एमएसआरडीसीनं एक्स्प्रेस वेवरील वेगमर्यादा 80 किलोमीटर प्रतितासावरुन 100 किलोमीटर प्रतितास करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.
मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी फास्ट, वाचणार अर्धा तास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 10:04 AM