मुंबई : सर्वांना समान न्याय व समान संधी, या तत्त्वावर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. मुंबई, पुणे व नागपुरातील ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांमध्ये जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी विधानसभेत ही घोषणा केली.अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया उद्या, १९ जूनपासून सुरू होत आहे. मुंबईच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत विज्ञान शाखेसाठी ५ टक्के आणि कला व वाणिज्य शाखेकरिता ८ टक्के अधिक जागा वाढवून देण्यात येत आहेत. पुणे व नागपूरसाठी आॅनलाइन प्रवेश क्षेत्रामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसाठी १० टक्के जागा वाढवून देण्यात येतील.दहावी परीक्षेच्या निकालांत भाषा व समाजशास्त्र विषयातील अंतर्गत मूल्यमापन बंद करण्यात आले होते. या निर्णयामुळे राज्यातील इयत्ता दहावीच्या निकालात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आली. अशा विद्यार्थ्यांना अन्य बोर्डांच्या विद्यार्थ्यांमुळे प्रवेशात अडचण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई, पुणे, नागपुरात अकरावीच्या जागांमध्ये वाढ; ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 5:05 AM