अधिवेशनामुळे गर्दी : प्रवाशांच्या हाती ‘वेटिंग’चे तिकीटनागपूर : हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात येणारे आंदोलनकर्ते, नेते, कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे मुंबई आणि पुण्याकडील भागात जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील ‘वेटिंग’वाढले असून, प्रवाशांना ‘कन्फर्म’ बर्थ मिळत नसल्याची स्थिती आहे.हिवाळी अधिवेशनानिमित्त संपूर्ण राज्यभरातून आंदोलनकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी नागपुरात येतात. दरम्यानच्या काळात मुंबई आणि पुणे मार्गावरील सर्वच रेल्वेगाड्यात वेटिंग वाढले आहे. १२१०६ गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये सर्वच एसीचे सर्वच कोच आणि स्लिपर क्लास कोच ५ जानेवारीपर्यंत फुल्ल झालेले आहेत. १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसही ३१ डिसेंबरपर्यंत फुल्ल झाली आहे. १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमध्येही १ जानेवारीपर्यंत बर्थ उपलब्ध नाहीत. १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेसही ५ जानेवारीपर्यंत फुल्ल झाली आहे. १२११४ नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्येही ६ जानेवारीपर्यंत एकही बर्थ उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. दिवाळीच्या काळात सर्वच रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती पाहावयास मिळाली. दिवाळी आटोपल्यानंतर वेटिंग आपोआप कमी झाले होते. परंतु आता हिवाळी अधिवेशनामुळे पुन्हा एकदा वेटिंगची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिकीट खरेदी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. अधिवेशन होईपर्यंत ही स्थिती अशीच कायम राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)
मुंबई, पुण्याच्या रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल
By admin | Published: December 08, 2014 12:55 AM