मुंबई - गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत जागोजागी पाणी तुंबले आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून, सत्ताधारी पक्षावर टीका करत आहे. मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे. तुंबलेली मुंबई महापौरांना दिसत नाही. जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत. असा टोला अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
आर्थिक राजधानी पूर्णपणे ठप्प झाली आहे. शिवसेनेच्या हातात २० वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता आहे. दर वर्षी महानगरपालिका मुंबई स्वच्छ झाल्याचा दावा करते. मात्र प्रत्यक्षात खबरदारी न घेतल्याने माणसं किड्या-मुंग्यांप्रमाणे मरत आहे. मुंबई तुंबली की तेव्हा सरकारला जाग येते असा आरोप पवार यांनी केला. जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत, असा खोचक टोला अजित पवारांनी भाजप-शिवसेनेला लगावला.
सगळं व्यवस्थित काम करत आहे असं सांगितलं जातंय, प्रत्यक्षात तसे होत नाही. मुंबईत जागोजागी पाणी तुंबले असताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईत कुठेच पाणी तुंबलं नाही असा दावा करतात. हा सत्तेचा माज आहे.गरज भासल्यास मनपा बरखास्त करा, अशी मागणी सुद्धा अजित पवार यांनी केली.