मुंबई: गेल्या काही दिवसात विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा मुंबईसह उपनगरात रात्री पासून दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरे, भिवंडी, मीरारोड, भाईंदर, पालघर, कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तसेच वसई- विरारमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे नालासोपाऱ्यातील अनेक रस्ते पाण्याखाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाल्याचे समोर आले आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी, बोरीवली, कांदिवली मीरारोड तसेच ठाण्यातील कल्याण आणि डोंबिवली परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. भिवंडी आणि परिसरालाही रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक घरे आणि दुकानांत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
पालघर जिल्ह्यात पहाटे चार वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून रस्ते, नदी, नाले तुडुंब वाहत आहेत. पालघर- माहिम रोड, पालघर-मनोर रोड, पालघर-माहिम हायवे रोडवरही पाणी साचलं आहे. तसेच पावसाचा फटका वाहतूकाला व रेल्वेला बसल्याने पश्चिम रेल्वेवरील ट्रेन थोड्या उशिराने धावत आहे. त्याचप्रमाणे डहाणू तालुक्यात देखील रविवारी पहाटेपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. पावसाची तीव्रता अधिक असून कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने या शहरात सखल भागात पाणी साचले असून मुख्य रस्ते पाण्याखाली गेले असून वीजही खंडीत झाली आहे.