नवी दिल्ली/मुंबई - मुंबई आणि उपनगरांत पावसाने कहर केला आहे. चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. तर 16 जणांचे रेस्क्यू करण्यात आले आहे. याशिवाय, विक्रोळी भागात एक इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झला आहे. यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दुःख व्यक्त केले आहे.
या घटनेवर दुःख व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले, "मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळीमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत काहींचा मृत्यू, तर काही जण जमी झाल्याचे ऐकूण अत्यंत दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबींयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच मदत आणि बचाव कार्य पूर्णपणे यशस्वी व्हावे यासाठी प्रार्थना करतो."
विक्रोळी भागात इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू - मुंबईमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी भागातही एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. DCP (झोन 7)चे प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर 5 ते 6 लोक अडकल्याची शक्यता आहे. तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसाचा भांडुप पंपिंग स्टेशनच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत काही भागांला पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळवले आहे.