मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागात ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेचा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औपचारिक शुभारंभ करण्यात आला. मुंबई पालिकेच्या महात्मा जोतिबा फुले मंडई परिसरातील स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी कचरा न करण्याचे, शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा संदेश दिला आणि सारा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला. स्वच्छतेसाठी शौचालयांची संख्या वाढवून एक प्रकारचे मोठे अभियान देशात सुरू झाले. तसेच घनकचरा व्यवस्थापनाची सुरुवात झाली. आता पंतप्रधानांनी स्वच्छता मोहिमेसाठी पंधरवडा जाहीर केला. आजपासून २ आॅक्टोबरपर्यंत म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत ही मोहीम चालणार आहे. या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने प्रत्येकाने कचरा करायचा नाही असे ठरवू या आणि आपले शहर स्वच्छ करू या, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या वेळी उद्योगमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह आमदार राज पुरोहित, स्थानिक नगरसेवक, राज्य सरकार व मुंबई महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, मार्केटचे पदाधिकारी, स्थानिक रहिवासी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेंतर्गत राज्यातील शहरी भागात श्रमदानातून स्वच्छता केली जाणार आहे. विशेष म्हणजे स्वच्छता हीच सेवा अभियानाच्या काळात जास्तीतजास्त जनसहभागातून स्वच्छता मोहीम राबवावी तसेच स्वच्छतेपूर्वी आणि नंतरचे फोटो, व्हिडीओ मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर पाठविण्याचे आदेश नगरविकास विभागाने शहरी भागातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांना दिले आहेत.श्रमदानाद्वारे सेवा दिवसआजच्या औपचारिक शुभारंभानंतर १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत सरकारी अधिकारी, कर्मचारी श्रमदानाद्वारे सेवा दिवस साजरा करतील. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी सर्व नागरिकांच्या सहभागाने समग्र स्वच्छता करणे, २५ सप्टेंबर रोजी शहरातील रुग्णालये, उद्याने, पुतळे, स्मारके, बस थांबे, तलाव आणि स्वच्छतागृहांची सफाई आणि १ आॅक्टोबर रोजी शहरातील प्रसिद्ध स्थळांच्या ठिकाणी व्यापक श्रेष्ठ स्वच्छता मोहीम राबवावी, अशा सूचना नगरविकास खात्याने यापूर्वीच स्थानिक स्वराज संस्थांना दिल्या आहेत.
मुंबईकरांनो, शहर स्वच्छतेचा संकल्प करा - मुख्यमंत्र्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 4:54 AM