ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3- मुंबई आणि ठाणे ही दोन शहरे आता मेट्रोनेही जोडली जाणार आहेत. वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली मेट्रो-४ मार्गाच्या प्रकल्प अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरडीएच्या (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) बैठकीत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प आता अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या मंजुरीमुळे प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे १४ हजार ५४९ कोटींचा प्रकल्प असून तो २0२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वडाळा-कासारवडावली प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई ते ठाणे प्रवास अर्धा तासात होईल, असे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले. मेट्रो-४ प्रकल्प दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे तयार करण्यात आला आहे. मुंबई ते ठाणे असा वाहनाने प्रवास करताना वाहतूक कोंडीसारख्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यावर मेट्रो-४ चा पर्याय फायदेशीर ठरेल, असे सांगितले जाते. मुंबई व ठाणे ही दोन्ही शहरे एकमेकांशी जोडली जातानाच या मार्गाच्या आसपासच्या परिसराचाही विकास होईल, अशी माहिती एमएमआरडीएने दिली. जवळपास ३२ स्थानके या मार्गात असतील. मेट्रो मार्गासाठी ३0 हेक्टर जागेमध्ये कार डेपोही उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याची शिफारस करतानाच प्रकल्पास निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची शिफारसही केली गेली आहे.
मेट्रो-४ मार्गावरील स्थानके
भक्ती पार्क मेट्रो, वडाळा टी.टी, आणिक नगर बस डेपो, सुमन नगर, सिध्दार्थ कॉलनी, अमर महल जंक्शन, गरोडिया नगर, पंत नगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सूर्य नगर, गांधी नगर, नवल हाऊसिंग, भांडुप महापालिका, भांडूप मेट्रो, शांग्रीला, सोनापूर, मुलुंड अग्निशामन केंद्र, मुलुंड नाका, तीन हात नाका (ठाणे), ठाणे आरटीओ, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजीवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजी-नी-वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडावली.