मुंबई, दि. 28 - प्रवाशांच्या सुरक्षेसाठी टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करणार असल्याचे राज्य सरकारने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले आहे. विखे पाटील यांनी शुक्रवारी ठाणे शहरातील रिक्षाचालकांच्या अरेरावीबाबत विधानसभेत लक्षवेधी प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. यासंदर्भात बोलताना त्यांनी मुंबई शहर व उपनगरे, ठाणे, कल्याण आदी शहरातील टॅक्सी-रिक्षाचालकांकडून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची अनेक उदाहरणे दिली.
विखे पाटील म्हणाले की, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट होणे, महिला प्रवाशांशी असभ्य वर्तणूक, प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणे आदी घटना वारंवार घडतात. वाहनाला काळा-पिवळा रंग देऊन कोणतीही परवानगी न घेता टॅक्सी वाहतूक केली जाते. रस्ते वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पोलिसांकडे असल्याने परिवहन विभाग यावर गांभिर्याने लक्ष द्यायला तयार नाही आणि त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी टॅक्सीवर नजर ठेवण्यासाठी त्यामध्ये ओला-उबेरप्रमाणे जीपीएस यंत्रणा लावणे अनिवार्य करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रिक्षा वाहतुकीसाठी ‘मागेल त्याला परवाना’ योजना राबवणार असल्याचीही माहिती देखील त्यांनी दिली.