ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेले मुंबईतील चर्चगेट स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. गुरुवारी सकाळी 11.10 वाजण्याच्या सुमारास चर्चगेट स्थानक बॉम्बनं उडवून देऊ, अशी धमकी देणारा निनावी फोन आला होता. आरपीएफ हेल्पलाईनला अज्ञातानं फोन करुन ही धमकी दिली आहे.
हा फोन आल्यानंतर रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. धमकीचा फोन आल्यानंतर एटीएस, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलासहीत शहर पोलीस चर्चगेट रेल्वे स्थानकात दाखल झाले आहेत. स्थानकात झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई हे शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या रडावर असते.
इसिस समुद्रातून मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी, इसिस ही दहशतवादी संघटना मुंबईत समुद्रामार्गे मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. या हल्ल्यासाठी मागील काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तींमध्ये वॉकीटॉकीवरुन संशयास्पद संवाद सुरू होता. या संभाषणाची माहिती हॅम रेडिओ ग्रुपकड़ून मिळताच तटरक्षक दलाने मुंबईत हायअलर्ट दिला होता. तसेच ३ दहशतवाद्यांविषयीची माहिती मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरातच्या सर्व सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली होती.
समुद्रातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या तटरक्षक दलाने मुंबईच्या किनारपट्टीजवळ काही संशयास्पद हालचाली टिपल्या होत्या. या हालचाली टिपल्यानंतरच अलर्टही देण्यात आला होता.
अरबी समुद्रात गुजरातच्या दिशेने २०० किलोमीटर परिसरात व्हीएचएफ वायरलेस यंत्रणेवर संशयास्पद संवाद ऐकून हॅम रेडिओ ग्रुपने ही माहिती देशातील सर्व सुरक्षा यंत्रणांना पुरवली. हॅम रेडिओ ग्रुपकडून मिळालेल्या माहितीआधारे समुद्रातून येत असलेल्या आवाजांचा माग काढल्यावर संशयितांना सरकारी सुरक्षा यंत्रणांकडील संभाषण ऐकता येऊ शकते किंवा खंडितही करता येऊ शकते हे लक्षात आले. वरळी तटरक्षक दल जिल्हा संख्या दोनला समुद्रात काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. या सर्व घडामोडींनंतर सावध झालेल्या तटरक्षक दलाने फॅक्सद्वारे सर्व सुरक्षा यंत्रणांना धोक्याची कल्पना दिली होती.