मुंबई: चेंबूरमध्ये झाडं अंगावर कोसळून एका महिला प्रवासीचा आज सकाळी दुर्दैवी अंत झाला. चेंबूरमधील ही दुसरी घटना आहे. याआधी जुलै महिन्यात चेंबूरमधील स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ या महिलेवर माडाचे झाडं कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे धोकादायक स्थितीत उभी झाडं मुंबईकरांसाठी मृत्युचा सापळा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
चेंबूरमध्ये डायमंड गार्डन परिसरातील बस थांब्यावर आज सकाळी ११ च्या सुमारास शारदा सहदेव घोडेस्वार (वय ४५) बसची वाट पाहत होत्या. बराच वेळ बस नसल्याने त्या जवळच असलेल्या झाडाशेजारील बाकावर बसल्या. त्याचवेळी अचानक झाड अंगावर पडून त्या जबर जखमी झाल्या. स्थानिकांनी त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पांजरपोळ येथे राहणा-या शारदा चेंबूर येथे घरकाम करीत होत्या. तिथल्याच ड्रिमलँड सोसायटीमध्ये घरकाम आटपून त्या बाहेर पडल्या होत्या. मात्र सोसायटीबाहेरील बस थांब्याजवळील गुलमोहरच्या झाडाने त्यांचा बळी घेतला.
गेल्या वर्षभरात या झाडाबाबत कोणतीच तक्रार आलेली नव्हती. पावसाळा आणि गणेशोत्सवापूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाने याची तपासणी केली होती. ४० फूट उंच आणि २२ फूट रुंद असलेल्या हे झाड चांगल्या स्थितीत होते असा दावा पालिकेने केला आहे. गेले दोन दिवस ओखी वादळामुळे सोसाट्याचा वारा होता. तसेच पाऊसही पडत असल्याने त्याचा फटका या झाडाला बसला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे हा अपघातच म्हणावा लागेल, असे अधिकारी म्हणत आहेत. तरीही याबाबतचा अहवाल उद्यान विभागामार्फत तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच मृत महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय होणार आहे.
झाडाचे मूळ सडलेले...
या दुर्घटनेनंतर पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. हे झाडाभोवती केलेल्या बांधकामामुळे या झाडाला घातलेले पाणी मुळापर्यंत जात नव्हते, असे आढळून आले. खोल मुळापर्यंत पाणी जात नसल्याने हे झाड कमकुवत झाले असावे. आद्रता वाढल्याने झाडाचे मूळ सडते. या झाडालाही कीड लागल्याचे दिसून आले आहे, असे एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त हर्षद काळे यांनी सांगितले.
पालिकेने पुन्हा जबाबदारी ढकलली
दरम्यान झाड अंगावर पडून महिलेचा मृत्यू होण्याची चेंबूरमधलीच ही दुसरी घटना आहे. याआधी चेंबूरमधील स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ या महिलेचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेस वारा जबाबदार असल्याचा अजब निष्कर्ष महापालिकेने चौकशी अहवालातून काढला होता. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते. मात्र पालिकेने पुन्हा आजच्या दुर्घटनेची जबाबदारी झटकली आहे.