लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठात निकालाच्या गोंधळानंतर आता परीक्षेमधील गोंधळांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनीला हॉल तिकीट मिळाले, परीक्षा देण्यासाठी शुक्रवारी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचली, पण विद्यापीठाकडून त्या विद्यार्थिनीचा क्रमांक परीक्षा केंद्रावर पोहोचला नसल्याने, त्या विद्यार्थिनीला परीक्षेला बसायलाच मिळाले नाही. ‘डिफॉल्टर’ असल्यामुळे नाव आले नसेल, असे या वेळी तिला सांगण्यात आल्याने, आता काय करायचे? हा प्रश्न विद्यार्थिनीला सतावत आहे. बीबीआय अभ्यासक्रमाची पाचव्या सत्राची परीक्षा सुरू आहे. शुक्रवार, १0 नोव्हेंबरला ‘मार्केटिंग इन बॅकिंग अँड इन्शुरन्स’चा पेपर होता. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनी सकाळी परीक्षा केंद्रावर पोहोचली. हॉल तिकीट क्रमांकाप्रमाणे तिने वर्ग शोधला व वर्गात गेली, पण वर्गात गेल्यावर तिला धक्का बसला. तिच्या पुढचा व मागचा क्रमांक बेंचवर होता, पण हिचाच क्रमांक लिहिला नसल्यामुळे आता काय करायचे, असे तिने त्या केंद्रावरील प्राध्यापकांना विचारले. एखादे वेळेस नंबर लिहायचा राहिला असेल, तू त्या वर्गातल्या रिकाम्या बेंचवर बस आणि पेपर दे, असे तिला सांगण्यात आले. विद्यार्थिनी दहा वाजता त्या वर्गात जाऊन बसली, पण त्या वर्गातल्या पर्यवेक्षकाने यादीत नाव नसल्याचे सांगून परीक्षेस बसण्यास मनाई केली. मीनल (नाव बदलेले आहे) बीबीआयचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी माझा पहिला पेपर होता. आधीच थोडा ताण होता. मला हॉल तिकीट मिळाले असल्यामुळे, मी निश्चितपणे परीक्षा केंद्रावर गेले होते, पण तिथे हा वेगळाच गोंधळ समोर आला. मी डिफॉल्टर असेन, तर मला विद्यापीठाने हॉल तिकीट कसे पाठविले? असा प्रश्न मीनलने उपस्थित केला आहे. या प्रकरणासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे अध्यक्ष अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकलेला नाही.
जबाबदार कोण?पाचव्या सत्राचा पहिला पेपर मला देता आलेला नाही. आता हे वर्ष वाया गेले, तर जबाबदार कोण? सोमवारी माझा पेपर आहे. मला कदाचित पेपर द्यायला मिळेल, पण जर त्या दिवशीही नाव यादीत नसल्यास, पेपर पाठवूनदेखील तपासणी करून मिळेल की नाही, याची शाश्वती नाही, असे विद्यार्थीनीचे म्हणने आहे.