कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासण्यास गुरुवारपासून सुरुवात केली. त्यासाठी ३५० प्राध्यापक आणि एक हजार संगणक उपलब्ध करण्यात आले आहेत. कॉमर्स, मॅनेजमेंट आणि लॉ (विधि) अभ्यासक्रमांच्या आॅनलाईन उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण क्षमतेने शुक्रवारपासून सुरू होईल.कुलपतींच्या सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाला उत्तरपत्रिका तपासणीबाबत मदत करण्याचा निर्णय घेतला. यानुसार शिवाजी विद्यापीठाने सुमारे ३५० प्राध्यापकांची यादी मुंबई विद्यापीठाला पाठविली. याशिवाय उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एक हजार संगणकांची तीन केंद्रांवर सुविधा उपलब्ध केली आहे.याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे महेश काकडे यांनी सांगितले की, कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ अभ्यासक्रमाच्या एकूण ३५ हजार उत्तरपत्रिका तपासून देण्याची मागणी मुंबई विद्यापीठाने आमच्याकडे केली आहे. या विद्यापीठाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मदत करणे आणि योग्य पद्धतीने उत्तरपत्रिका तपासून देण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाचा परीक्षा विभाग काम करेल. आमच्याकडून जमेल त्याप्रमाणे संपूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे.
उत्तरपत्रिकांची आजपासून शिवाजी विद्यापीठाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 4:42 AM