मुंबई - मुंबई विद्यापीठाने मालवणी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश केला. या भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनात रविवारी दिले.रविवारी सकाळी दादर येथील नायर सभागृहात मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्राच्या सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. पेडणेकर यांनी सांगितले की, कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा सिंधुदुर्ग दौरा केला होता, त्यानंतर तेथे विद्यापीठाने महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला. येथील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस)चे विद्यार्थी आणि जलदूत राजेंद्र सिंह यांच्या संकल्पनेतून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा उपक्रम तेथे राबविण्यात येत आहे. या जिल्ह्यानंतर लवकरच हा प्रकल्प रायगड आणि पालघर येथे राबविण्यात येणार आहे. मालवणी तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता झाराप येथे २५ एकरांत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरून, आपल्या मातीत राहून ही पिढी भूमीला अधिक वृद्धिंगत करेल. या वेळी कुलगुरूंनी अस्सल मालवणी भाषेत उपस्थितांशी संवाद साधला.या वेळी उद्घाटन समारंभात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मालवणी भाषेत सांगितले की, मालवणी भाषा टिकायला हवी. त्यासाठी आपणास संवाद वाढवायला हवा. अजूनही घरात या भाषेतून संवाद होतो. त्यामुळे त्याचा न्यूनगंड न बाळगता ही भाषा टिकायला हवी़ त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अखेरीस मालवणी माणूस महापौर असल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना चहासाठी महापौर बंगल्यावर येण्याचे आवाहनही केले. या उद्घाटन सोहळ्याला संमेलनाचे मावळते अध्यक्ष ज्येष्ठ मालवणी नाटककार गंगाराम गवाणकर, संमेलाध्यक्ष प्रभाकर भोगले, मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत आणि कार्याध्यक्ष सतीश लळीत, अभिनेता अनिल गवस उपस्थित होते. याप्रसंगी अभिनेते अनिल गवस यांनी सांगितले की, मालवणी माणसांकडे प्रचंड गुणवत्ता आहे़ केवळ आपल्या माणसांशी न भांडता ती ऊर्जा कामाप्रति वापरली पाहिजे. मावळते संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण’ नाटकाच्या स्मृतींना उजाळा दिला़संमेलनाच्या माध्यमातून भाषा संवर्धनाला मिळेल गती
मालवणी भाषेची तशी काळजी करायची गरज नाही, कारण जोवर मालवणी बोलीभाषा घरोघरी नांदतेय तोवर तिला मरण नाही. तिचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे या प्रक्रियेकरिता अधिकाधिक माहितीची देवाण-घेवाण झाली पाहिजे. अशा संमेलनाच्या माध्यमातून या प्रक्रियेला अधिक गती मिळेल ही आशा आहे.- प्रभाकर भोगले, संमेलनाध्यक्ष