मुंबई : विद्यापीठाच्या विविध कामांत सुसूत्रता आणण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नव्या कंपनीला कंत्राट दिले असले, तरी परीक्षेसंबंधीची कामे अद्यापही कोणावरच सोपविली जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठ व्यवस्थापनातील या गोंधळाला नव्या यंत्रणेनंतर पूर्णविराम मिळेल, अशी आशा असतानाच परीक्षेसंदर्भातील नियोजनाबाबत काहीच पावले उचलण्यात येत नसल्याने याबाबतचे कामकाज चालणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विद्यापीठांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी विद्यापीठाने एमकेसीएल कंपनीला कंत्राट दिले होते. मात्र त्यांच्याकडून यासंदर्भातील कामकाज नीट होत नव्हते. परिणामी विद्यापीठाने याकामाकरिता नव्याने निविदा मागविल्या. त्यानंतर अखेरीस विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी ‘एक्झॉन कंपनीला’ कंत्राट दिले. हे कंत्राट तीन वर्षांसाठीचे असून, करारानुसार ही कंपनी फक्त ‘प्रवेशपूर्व नोंदणी’ आणि ‘पात्रता तपासणी’ ही दोनच कामे करणार आहे. परीक्षांच्या नियोजनामुळे नेहमीच विद्यापीठाच्या कामकाजावर टीका होते. आताही याबाबत हलगर्जीपणा बाळगण्यात येत असल्याने परीक्षांचे हॉल तिकीट बनवणे आणि वितरीत करणे, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर आणि परीक्षेसंदर्भातील कैक कामे कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षापासून पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या सत्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका स्वत: तयार करण्याची जबाबदारी विद्यापीठाने घेतली आहे. आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विविध परीक्षांसाठीची कामे सप्टेंबरमध्ये सुरू होणे अपेक्षित असते. मात्र सद्य:स्थितीत विद्यापीठाकडे कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होणार आहे. (प्रतिनिधी)बोजा कमी होईना तांत्रिक अडचण सांगत विद्यापीठाचा तृतीय वर्ष बीकॉमचा निकाल पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली होती. या निकालाव्यतिरिक्त अन्य निकालही लागले नाहीत. त्यातच विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांची संख्या ७४२ पर्यंत गेली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या संख्येतही तुरळक वाढ केल्याने विद्यापीठ कामकाजाचा बोजा कमी होण्याची चिन्हे नाहीत.विद्यापीठाच्या सुरळीत कामकाजासाठी नव्या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. ही कंपनी विद्यार्थ्यांची ‘नोंदणी’ आणि पात्रता’ तपासणीचे कामकाज करेल. मात्र परीक्षेसंदर्भात कामे करण्यासाठी विद्यापीठाकडे सध्या तरी कोणतीच यंत्रणा नाही. परीक्षांच्या कामकाजासाठी नव्याने पुन्हा निविदा मागवण्यात येणार आहेत. याकरिता विद्यापीठ पातळीवर कार्यवाही सुरू आहे. - डॉ. एम. ए. खान, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियोजन वाऱ्यावर
By admin | Published: June 13, 2016 5:25 AM