मुंबई: तेरावी प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाने आॅनलाईन प्रवेश पूर्व नोंदणी अनिवार्य केली आहे. पण प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी (१४ जून) विद्यापीठाचे संकेतस्थळ क्रॅश (तांत्रिक बिघाड) झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.मुंबई विद्यापीठातर्फे तेरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश पूर्व नोंदणी अनिवार्य केली आहे. मंगळवारी या प्रवेश प्रक्रियेचा पहिला दिवस होता. पण प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ क्रॅश झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी करता आली नाही. सकाळी १०.३० वाजता प्रवेशप्रक्रिया सुरु होणार होती. त्यानुसार संकेतस्थळावर नोंदणी सुरु करण्यात आली. परंतु एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट दिल्यामुळे विद्यापीठाचे संकेतस्थळ क्रॅश झाले. यात सर्व्हरवर मोठा ताण आला. झाला प्रकार लक्षात आल्यानंतर प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी अधिक सर्व्हर लावण्याचे काम विद्यापीठ स्तरावर सुरु असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. सकाळी प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही वेळ संकेतस्थळ सुरु होण्यास अडथळा निर्माण होत होता. मात्र त्यानंतर संकेतस्थळ क्रॅश झाले. हा गोंधळ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहिल्याने विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी आॅनलाईन प्रवेश पूर्व नोंदणी करता आली नाही. शिवाय नोंदणीचा एक दिवस वाया गेल्याने प्रवेशपूर्व नोंदणीत वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या प्रकरणी विद्यापीठाच्या व्यवस्थापन माजी सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उठविली आहे. उशीरा सुरु होणारी प्रक्रिया त्यातच संकेतस्थळाचा गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांवर प्रवेशाचे दडपण आले आहे. प्रवेशासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देणार हे माहित असताना आधीच सर्व्हर का वाढवले नाही?असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)‘हेल्पलेस’ हेल्पलाईननोंदणी प्रक्रियेतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठाने हेल्पलाईन सुरु केल्या आहेत. पण ऐन गोंधळाच्या वेळी या हेल्पलाईनदेखील ‘हेल्पलेस’ ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.प्रथमवर्ष पदवीच्या प्रवेशपूर्व नोंदणीला मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली. आतापर्यंत ३० हजार विद्यार्थ्यांनी यशस्वी अर्ज केले आहेत. सकाळी संकेतस्थळ सुरु झाल्यापासून जवळपास सव्वा लाख विद्यार्थ्यांनी एकाचवेळी प्रवेश अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिल्याने संकेतस्थळ काही काळ धीम्या गतीने चालत होते. मात्र त्यानंतर ही प्रक्रिया सुरळीत सुरु झाली. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत चालू राहण्यासाठी १२ सर्व्हर कार्यान्वित करण्यात आले, अजून ५ अतिरिक्त डेडिकेटेड सर्व्हर लावण्यात येत आहेत. प्रवेशपूर्व नोंदणीची ही प्रक्रिया २४ तास कार्यान्वित राहिल.- लीलाधर बन्सोड, उपकुलसचिव, जनसंपर्क विभाग
मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ ‘क्रॅश’
By admin | Published: June 15, 2016 3:19 AM