लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ढगाळ वातावरणासह ऊन्हाचा कडाका आणि आर्द्रतेमध्ये नोंदवण्यात येणारे चढउतार, अशा ‘ताप’दायक वातावरणाचा मुंबईकरांना अधिकच फटका बसू लागला असून, मागील तीन दिवसांपासून मुंबईचा उकाडा वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे, कमाल तापमान ३३ ते ३४ अंशावर असतानाही वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांना घाम फुटत असून, यात उत्तरोत्तर वाढच होणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. मागील चारएक दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३३, ३४ अंशावर स्थिर आहे. मात्र, वातावरणात बदल होत असून, हवामान काही अंशी ढगाळ नोंदवण्यात येत आहे. शिवाय आर्द्रतेमध्येही चढउतार नोंदवण्यात येत असून, ‘ताप’दायक बदल मुंबईकरांना घाम फोडत आहेत. दरम्यान, ८ ते ९ मे दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ ते १२ मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर सोमवारसह मंगळवारी मुंबईचे आकाश निरभ्र राहील आणि कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
घामाच्या धारांनी मुंबईकर बेजार
By admin | Published: May 08, 2017 4:45 AM