मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना गारठवणाऱ्या थंडीने बुधवारी १२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करत, तीन वर्षांतील निचांकी तापमानाचा आकडा गाठला आहे. परिणामी, दरवर्षी जानेवारी महिन्यात गुलाबी थंडीचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना यंदा मात्र, बोचऱ्या थंडीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना रात्री थंडीचा कहर सहन करावा लागत आहे. तर सकाळी थंडीचा प्रभाव जाणवत असून, दुपारीही थंड वाऱ्याची झुळूक अनुभवायला मिळत आहे. या आधी गतवर्षी जानेवारी महिन्यात १२.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद केली होती, तर २०१५ साली १३.६ आणि २०१४ साली १३.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद हवामान खात्याने नोंदवली होती. दिवसा वायव्येकडून वाहणारे वारे रात्री उत्तरेकडून वाहत आहेत. त्यामुळे आणखी दोन दिवस मुंबईतील तापमानाचा पारा उतरलेला असेल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबईकर गारठले! तीन वर्षांतील नीचांकी तापमान
By admin | Published: January 12, 2017 4:38 AM