मुंबई : केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील सत्तेतून लालबावटा हद्दपार झाला आहे. आता केवळ त्रिपुरात लालबावटा सत्तेत आहे. ज्या मोजक्या राज्यांत भारतीय जनता पार्टीचे कणमात्रही अस्तित्त्व नाही, अशांत त्रिपुरादेखील एक आहे. आता लालबावट्याला वेसण घालण्याची जबाबदारी मुंबईकर असलेल्या सुनील देवधर यांच्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी टाकली आहे. प्रभारींच्या नव्या नियुक्त्यांमध्ये सुनील देवधर यांना त्रिपुराचे प्रभारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्रिपुरात आमदार तर सोडाच पण भाजपाचा साधा एक नगरसेवकही नाही. आता गेल्या २४ वर्षांपासून पूर्वांचलाशी संबंधित असणारे सुनील देवधर त्रिपुराचे प्रभारी असतील. गेल्या ४ वर्षांपासून भाजपात सक्रिय झालेले देवधर प्रथमच राष्ट्रीय राजकारणात यानिमित्ताने झळकले आहेत. प्रभारींच्या नियुक्त्यांमध्ये अमित शहा यांनी महाराष्ट्रासह मुंबईला झुकते माप दिले आहे. खासदार पूनम महाजन यांना दिव-दमण, दादरा नगर हवेलीचे प्रभारी नेमले आहे. तर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे विनय सहस्रबुद्धे यांना मध्य प्रदेशचे प्रभारी करण्यात आले आहे. मूळचे संगमनेरचे असलेल्या श्याम जाजू यांना उत्तराखंडचे प्रभारी म्हणून नेमले आहे. यापूर्वी मुंबईचे भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्मनाभ आचार्य यांना नागालँड आणि त्रिपुराचे राज्यपाल केले आहे. तर राम नाईक यांना उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नेमलेले आहे. सुनील देवधर हे ८ वर्षे मेघालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यानंतर ते पूर्वांचलाशी संपर्कात असून माय होम इंडिया या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पूर्वांचलातील तरुणांसाठी कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)
मुंबईकर सुनील देवधर त्रिपुरात भाजपाचे प्रभारी
By admin | Published: October 23, 2014 4:09 AM