मुंबई : विदर्भ आणि मराठवाडा उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला असतानाच दुसरीकडे वाढत्या आर्द्रतेने मुंबईकरांना घाम फोडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशावर स्थिर असले तरीदेखील आर्द्रता मात्र ९० टक्क्यांवर नोंदविण्यात येत आहे.
शिवाय उत्तर-पश्चिमेकडून वाहणारे वारे यात भर घालत आहेत. परिणामी, हवामानात नोंदविण्यात येणारे बदल मुंबईकरांसाठी तापदायक ठरत असून, वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी परभणी आणि सोलापूरचे कमाल तापमान ४५ अंश नोंदविण्यात आले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.
मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण,गोव्याच्या काही भागात आणि मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्याउर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.