- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचे निवेदन पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर बुधवारी आणले. त्यानुसार, १९ पैसे ते ७ रुपये ५४ पैशांपर्यंत पाणीपट्टीमध्ये वाढ होऊ शकते. मात्र, ही दरवाढ मागे घेण्यासाठी भाजपाने प्रशासनावर दबाव टाकला. काँग्रेस, समाजवादी व मनसेनेही या दरवाढीचा कडाडून विरोध केला. त्यामुळे सत्ताधारी एकटे पडले.पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या जकात कराऐवजी लवकरच वस्तू व सेवा कर लागू होत आहे. याचा मोठा फटका पालिकेच्या उत्पन्नाला व मोठ्या प्रकल्पांना बसणार आहे. जलस्रोत वाढविण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांसाठीही निधीची कमतरता भासणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवनवीन स्रोत पालिका शोधत आहे. यापैकीच एक असलेल्या पाणीपट्टीच्या दरांत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.या प्रकल्पांसाठी निधी नियमित उपलब्ध होण्यासाठी पालिकेने २०१२मध्येच पाणीपट्टीमध्ये ८ टक्के वाढ करण्याची तरतूद केली आहे. ही मुदत संपुष्टात आल्याने, पुन्हा दरवाढीला मंजुरी मिळवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही, याचे भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी स्मरण करून दिले. त्यांचे समर्थन करीत विरोधी पक्ष नेता रवी राजा, मनसे आणि समाजवादीनेही पाणी दरवाढीचा विरोध केला.अशी आहे दरवाढ चाळी व झोपडपट्टीमध्ये १९ पैसे, प्रकल्पबाधित इमारतींसाठी २१ पैसे, व्यावसायिक संस्थांचे १.१८ रुपये, उद्योगधंदा-कारखाने २.५३ रुपये, रेसकोर्स-पंचतारांकित हॉटेल ३.७७ रुपये़, शीतपेय, बाटलीबंद पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनींच्या दरात ५.२४ रुपये, तसेच नियम १.६ खाली येणाऱ्या ग्राहकांच्या पाण्याच्या दरात ७.४४ रुपये अशी वाढ प्रस्तावित आहे. - या दरवाढीतून पालिकेच्या तिजोरीत वार्षिक ६८.८८ कोटी जादा उत्पन्न जमा होणार आहे. - पाणीपट्टी आकाराच्या ७० टक्के अधिक मलनिस्सारण कर आकारण्यात येतो.प्रकार आणि प्रस्तावित दर - चाळी व झोपडपट्टी ३.४५- प्रकल्पबाधित इमारती ३.८७- इतर घरगुती ग्राहक ४.६६- बिगर व्यावसायिक १८.६६- व्यावसायिक संस्था ३४.९९- उद्योगधंदा-कारखाने ४६.६५- रेसकोर्स-पंचतारांकित हॉटेल ६९.९८- शीतपेय, बाटलीबंद पाणीपुरवठा करणाऱ्या कंपन्या ९७.२०(आकडेवारी रुपयांमध्ये)