नागपूर : मुंबईत मैदाने, मोकळ्या जागांची संख्या कमी आहे. वाढती लोकसंख्या व नागरीकरणामुळे मुलांना खेळण्यासाठी मैदान मिळणे कठीण झाले आहे. याची दखल शासनाने घेतली आहे. सध्या विकास आराखड्यात मुंबईत प्रती व्यक्ती १ चौरस मीटर जागा मोकळी ठेवण्याची तरतूद आहे. मात्र, भविष्यातील स्थिती विचारात घेता नव्या विकास आराखड्यात प्रती व्यक्ती मोकळ्या जागेची अट दुप्पट केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यामुळे मुंबईत अधिक जागा मोकळ्या राहतील व मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येईल.प्रश्नोत्तराच्या तासात आसीफ शेख यांनी मुंबईत मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नसून मुलांना रस्त्यावर खेळावे लागत असल्याचे सांगितले. काही संस्था मैदानावर खेळण्यासाठी शुल्क आकारत असल्याची तक्रारही त्यांनी केली. यावर नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मैदानांवर शुल्क आकारले जात नसून काही क्रीडा संकुलांमध्ये नाममात्र शुल्क आकारण्यात येत असल्याचे सांगितले. याच संबंधात योगेश सागर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाने शाळांना उपलब्ध करून दिलेली मैदाने शाळा सुटल्यानंतर सर्वांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देता येईल का, यावर विचार केला जाईल असे सांगितले. याशिवाय बऱ्याच आरक्षित जमिनीवर मोठ्या प्राणात झोपडपट्ट्या वसल्या आहेत. (प्रतिनिधी)
मुंबईकर घेणार मोकळा श्वास
By admin | Published: December 17, 2014 6:20 AM