मुंबई: अंतराळात घडणाऱ्या अनेक घडामोडी या मानवी दृष्टिपल्याड होत असतात, पण सोमवार, १४ डिसेंबर रोजी अवकाशातील आतषबाजी देशातील नागरिकांना अनुभवता येणार आहे. मिथुन तारका समूहातून रात्री ९ ते मध्यरात्री ४ वाजेपर्यंतच्या काळात उल्का वर्षाव दिसणार असल्याची माहिती नेहरु तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली. या उल्कावर्षावाचा तीव्र बिंदू भारतीय वेळेप्रमाणे रात्री साडेअकराच्या सुमारास आहे. एका तासात सुमारे ७० उल्का मिथुन तारका समूहातील कॅस्टर या ताऱ्याच्या दिशेकडून येताना दिसण्याची शक्यता आहे. एखादा धूमकेतू हा सूर्याची परिक्रमा करत असताना काही वेळेस सूर्याजवळून जातो. त्यावेळी त्याच्या काही भागाचे तुकडे होतात. हे तुटलेले बारीक तुकडे किंवा कण धूमकेतूसारखेच सूर्याची परिक्रमा करत असतात. पृथ्वीची कक्षा या धूमकेतूच्या कक्षेस छेदते. पृथ्वी ज्यावेळी त्या छेदबिंदूवर येते, तेव्हा या कणांचा पृथ्वीवर मारा होतो. त्यावेळी उल्का वर्षाव दिसून येते. ज्या तारका समूहातून अशा उल्कावर्षाव होताना दिसतो, त्या तारकासमूहाच्या नावाने तो उल्का वर्षाव ओळखण्यात येतो. मिथुन तारका समूहाचा हा वर्षाव एकेकाळी धूमकेतू असलेला, पण आता लघुग्रह झालेल्या फेथॉनच्या धुरळ्यामुळे होतो, असे परांजपे यांनी सांगितले. परांजपे यांनी पुढे सांगितले की, रात्री ९ ते मध्यरात्रीपर्यंत तुम्ही जमिनीवर पडून सरळ वर आकाशाकडे पाहू शकता. त्यानंतर मध्यरात्री ते ३- ४ वाजेपर्यंत पश्चिम क्षितिजावर सुमारे ४५ अंशावर या उल्का दिसू शकतात. हा वर्षाव देशातून खूप चांगला दिसण्याची शक्यता आहे. कारण उल्का वर्षावाची तीव्रता मध्यरात्रीच्या जास्त सुमारास आहे आणि चंद्रास्तापूर्वी ३ तास अगोदरच वर्षाव झालेला असेल. (प्रतिनिधी)उल्का वर्षाव पाहण्यासाठी कुठे जाऊ शकता? उल्का वर्षाव पाहण्यासाठी गाव शहरापासून दूर अंधाऱ्या जागेत जाणे केव्हाही चांगले, पण तरीसुद्धा तुमच्या शहरात अंधाऱ्या जागी, जिथे डोळ््यावर सरळ प्रकाश पडणार नाही, अशी जागा निवडावी.उल्का वर्षाव नेमका कसा दिसणार? : या उल्का वर्षावातील उल्का गटागटाने येतात. सुमारे ४ ते ५ मिनिटे काहीच घडत नाही. मग एकदम ४-५ उल्का दिसतात. त्यातील काही तर खूप प्रखरही असतात. रात्रीच्या अंधारात १ मिनिटांचा वेळ पण खूप मोठा वाटू शकतो, पण तरीही नेटाने अंधारात बारीक लक्ष ठेवून अवकाशाचे निरीक्षण केल्यास उल्का वर्षावाचा आनंद लुटता येईल. उल्का म्हणजे काय? सौरमालेत फिरत असलेला एखादा धूलीकण जेव्हा अती वेगाने वातावरणात प्रवेश करतो, तेव्हा वातावरणातील घटकांशी त्याचे घर्षण होते आणि त्यावेळी इतकी ऊर्जा निर्माण होते की, धूलीकण अक्षरश: पेट घेतो, यालाच उल्का असे संबोधतात.
मुंंबईकरांनाही पाहता येणार ‘स्वर्गीय आतषबाजी’
By admin | Published: December 14, 2015 2:07 AM