मुंबई : मुंबईत या वर्षी चांगला पाऊस झाल्यास पाणीप्रश्न तर मिटेलच, पण त्याचबरोबर मुंबईकरांना गुड न्यूजही मिळणार आहे. सध्या दररोज होत असलेल्या ३ हजार ७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठ्यात आॅक्टोबर २०१७ पासून २६५ दशलक्ष लीटर्सने वाढ होणार आहे. त्यामुळे पाण्याची मागणी आणि पुरवठ्याचा मेळ बसून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होत असतो. परंतु पाण्याची मागणी मात्र दररोज ४ हजार ३०० दशलक्ष लीटर्स एवढी आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी महापालिकेने अनेक उपक्रम हाती घेतले. यापैकी पाणीगळती व चोरी रोखण्यासारख्या उपक्रमांना अपयश आले, तर पुनर्प्रक्रिया प्रकल्पांची गती मंदावली. तरीही यातील काही प्रकल्प लवकरच मुंबईकरांना दिलासा देणार आहेत. यापैकी एक असलेल्या भांडुप येथील जल पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून ६० दशलक्ष लीटर्स पाणी मिळू शकणार आहे.तर दररोज ६० दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या पांजरपोळ येथील जल पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून ४० दशलक्ष लीटर्स, मोडक सागर तलावातून अतिरिक्त ४० दशलक्ष लीटर्स जलसाठा उपलब्ध होणार आहे. गुंदवली भांडुप जलबोगद्यामुळे भातसातून पाणीपुरवठा होण्याची क्षमता १०५ दशलक्ष लीटर्सने वाढली आहे. असा एकूण २६५ दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा वाढणार आहे. म्हणजेच दररोज ४ हजार १५ दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा आॅक्टोबरपासून होऊ शकेल, अशी हमीच आयुक्तांनी अर्थसंकल्पातून दिली आहे. (प्रतिनिधी)>जल पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून ४० दशलक्ष लीटर्स, मोडक सागर तलावातून अतिरिक्त ४० दशलक्ष लीटर्स जलसाठा उपलब्ध होणार आहे.पाणीचोरी व गळतीतून दररोज २७ टक्के म्हणजे सुमारे नऊशे दशलक्ष लीटर पाणी वाया जात आहे.भातसातून दररोज १ हजार ९१० दशलक्ष लीटर्स पाणी उचलले जाते. यामध्ये १०५ दशलक्ष लीटरने वाढ झाल्यानंतर मुंबईत एकूण २ हजार १५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होणार आहे.>३,७५0दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज मुंबईला केला जातो. परंतु पाण्याची दररोजची मागणी ४ हजार ३०० दशलक्ष लीटर्स एवढी आहे.
मुंबईकरांना दररोज २६५ दशलक्ष लीटर जादा पाणी
By admin | Published: April 04, 2017 2:56 AM