ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 20 - मुंबईकरांसाठी खुशखबर असून पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झालेला पाऊस मुंबईतही दाखल झाला आहे. हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. उन्हाने त्रासलेले मुंबईकर जून महिना सुरु झाल्यापासून पावसाची वाट पाहत होते. पण जून महिना संपायला आला तरी पाऊस काही पडत नव्हता. रविवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडला ज्यामुळे हिंदमातासारख्या सखोल भागात पाणी साचलं होतं.
येत्या 48 तासात कोकण, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये पाऊस कायम राहिलं असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र वगळता संपुर्ण महाराष्ट्राला पावसाने व्यापले आहे.
पूर्व विदर्भातून राज्यात प्रवेश करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचे अखेर रविवारी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणात आगमन झाले. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारा बळीराजा त्यामुळे सुखावला आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़
मराठवाड्यात औरंगाबाद वगळता सर्व जिल्ह्यांत रविवारी संपलेल्या 24 तासांत पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात वीज पडून एक मजूर ठार झाला. उस्मानाबादमध्ये शनिवार - रविवारी पावसाने हजेरी लावली. नांदेड व लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. बीडमध्ये रिमझिम झाली. हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही रिमझिम झाली. शनिवारी परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर रविवारीही भूरभूर सुरूच होती. जालना जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भात अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरण परिसरात रविवारी मान्सूनचे आगमन झाले़ शनिवारी रात्री नगरला हलक्या सरी झाल्या. कर्जत तालुक्यात 72 मि़मी़ पाऊस पडला़