मुंबई - उन्हाचा ताप आणि उकाड्याने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना आज (शनिवारी) अखेर मान्सूनने दिलासा दिला. हवामान खात्याने मान्सून शनिवारी मुंबईत दाखल झाल्याचे जाहीर केले; आणि मुंबईकरांनी आनंदासह जल्लोषात मान्सूनचे स्वागत केले. पहिल्याच दिवशी मान्सूनने मुंबईकरांना मोठा झटका दिल्याने ठिकठिकाणी मुंबई तुंबल्याचे चित्र होते. तर ठिकठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. तरीही एप्रिल आणि मे महिना उन्हाच्या कडाक्यात काढलेल्या मुंबईकरांना मान्सूनच्या सुखद गारव्याने चांगलाच दिलासा मिळाल्याचे चित्र होते.शनिवार सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात धोधो पावसाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत पावसाचा मारा कायम होता. वेगाने वाहणारा वारा, पावसाचे टपोरे थेंब, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट; अशा काहीशा वातावरणात मुंबई अक्षरश: न्हाऊन निघाली. खवळणारा समुद्र आणि वेगाने वाहणारा वारा अंगावर झेलण्यासाठी मुंबईकरांनी समुद्रकिनारी गर्दी केली होती. गेट वे आॅफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर, जुहू चौपाटीसह वर्सोवा चौपाटी येथे मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांनी गर्दी केली होती. विशेषत: या गर्दीमध्ये तरुणाईची संख्या अधिक होती.गेट वे आॅफ इंडिया आणि मरिन ड्राइव्हसह गिरगाव चौपाटीवर मान्सूनचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र होते. सकाळपासून सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत कायम राहिला; आणि नंतर त्याचा जोर ओसरला. परिणामी या ठिकाणांवरील गर्दी उत्तरोत्तर वाढतच गेली. येथील गर्दीला आवरण्यासह एखादी दुर्घटना घडू नये म्हणून सकाळपासूनच येथे महापालिकेचे कर्मचारी आणि पुरेसे पोलीसतैनात करण्यात आले होते. शिवाय येथे येत असलेल्या नागरिकांना समुद्रात उतरू नये, असेही आवाहन केले जात होते.सकाळी बरसलेल्या पावसाने दुपारी काही काळ विश्रांती घेतली. परिणामी मुंबई काही वेळाने पूर्वपदावर येत होती.मात्र सूर्यास्ताला पुन्हा पावसाने जोर पकडला. या कारणाने लोकलसह रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला. पावसाने रौद्ररूप धारण केले असतानाच दुसरीकडे मात्र मुंबईकर पावसाचा आनंद द्विगुणित करत होते.वरळी सीफेस येथे सायंकाळी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. समुद्राच्या लाटा आणि वारा अंगावर झेलत येथे आलेल्या मुंबईकरांनी परिसर सेल्फीमध्ये कैद केला.वांद्रे रेक्लेमेशन येथेही तरुणाईने मोठी गर्दी केली होती. यात तरुणाईची संख्या सर्वाधिक होती. वेगाने वाहणारा वारा आणि पाऊस; अशा उत्साही वातावरणात गर्दी उत्तरोत्तर वाढतच असल्याचे चित्र होते.मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात गुडघ्या एवढ्या साचलेल्या पाण्यात बच्चेकंपनीने धमाल केली. पाण्यात पोहण्यासह कागदी होड्या सोडत बच्चेकंपनीने शाळेची सुट्टी सत्कारणी लावली.च्मान्सूनची वाट पाहत असलेल्या मुंबईकरांना शनिवारी पावसाने दिलासा दिला. पहिल्याच पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या बच्चेकंपनीने पावसात भिजत आपला आनंद द्विगुणित केला.च्शिवाय तरुणाईने घराबाहेर पडत पहिल्या पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलत पावसाचे स्वागत केले. दरम्यान, पहिल्याच पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते.च्अशा वेळी येथील स्थानिकांसह प्रवासीवर्गाला मदत करण्यासाठी तरुणाई सरसावली असल्याचे चित्र होते.
मुंबईकरांचा मान्सून मूड, समुद्रकिनारी केली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 7:06 AM