मुंबई : मुंबईतील २३ टक्के महिला आणि ३० टक्के पुरुषांना उच्च रक्तदाबाचा अधिक धोका तसेच १५ टक्के महिला व २४ टक्के पुरुष उच्च कोलेस्ट्रॉलपासून ग्रस्त आहेत. वजनाची समस्या, अपुऱ्या शारीरिक हालचाली, धूम्रपान, तणाव, चिंता आणि उदासीनता या शहरात सर्व वयोगटांच्या लोकांना प्रभावित करणाऱ्या जीवनशैलीच्या गंभीर समस्या आहेत.एका खासगी संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात बंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि पुणे शहरांचा समावेश होता. देशाच्या लोकसंखेमधील ३० वर्षे वयाखालील सुमारे ३० टक्के पुरुष आणि १५ टक्के महिला उच्च रक्तदाबाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. २१ टक्के पुरुष आणि ९ टक्के महिला यांना मधुमेह होण्याचा धोका आहे, तर ११ टक्के महिला आणि २३ टक्के पुरुष उच्च कोलेस्ट्रॉलने ग्रस्त आहेत. ‘शारीरिक वजन’ ही सद्यस्थितीत मुंबईकरांना भेडसावणारी मुख्य समस्या असून, ७६ टक्के महिला, तर ८३ टक्के पुरुष हे एकतर अतिलठ्ठ अथवा कमी वजनाचे आहेत. १८ महिन्यांच्या कालावधीत १० लाख आरोग्य चाचण्यांचा आधार घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला असून, याद्वारे भारतीयांचा आरोग्याबद्दलचा धरसोड दृष्टिकोन दिसून येतो. ते निरोगी राहू इच्छितात, पण प्रत्यक्षात त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी पुरेसे प्रयत्न करीत नाहीत, हे यातून स्पष्ट झाले आहे.मुंबईतील ९८ टक्के महिला आणि ९३ टक्के पुरुष निरोगी राहाण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूक आहेत आणि त्यांना त्यासाठी आवश्यक जीवनशैली बदलण्याची गरज वाटते. विसंगती मात्र अशी की, देशात एकूण लोकसंख्येच्या २८ टक्के लोकांना खरे तर वैद्यकीय मदतीची गरज आहे, पण ते वेळेवर डॉक्टरांची भेट घेत नाहीत. सर्वेक्षणातील अहवालात हेदेखील आढळून आले की, २० टक्के लोकसंख्या एक बैठी जीवनशैली जगत आहेत आणि म्हणून हृदयरोग होण्याचा दोन पटीने जास्त धोका आहे. (प्रतिनिधी)- देशाच्या लोकसंखेमधील ३० वर्षे वयाखालील सुमारे ३० टक्के पुरुष आणि १५ टक्के महिला उच्च रक्तदाबाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे.
मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा धोका!
By admin | Published: April 22, 2017 3:23 AM