मुंबई : नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने रस्त्यांचे नामकरण केले खरे. मात्र या रस्त्यांचे नामफलक बऱ्याच ठिकाणी नसल्याने इच्छित मार्गावर जाण्यासाठी मुंबईकरांना वाट शोधावी लागते. ही शोधाशोध थांबण्यासाठी महापालिकेने १९० ठिकाणी दिशादर्शक फलक बसविण्याचा निर्णय घेतला आहे.हे फलक ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या मानकांनुसार असणार आहेत. यापैकी ९० फलक हे मोठ्या आकाराचे असून, १०० फलक हे छोट्या आकाराचे असणार आहेत. दादाभाई नौरोजी मार्ग, खान अब्दुल गफ्फार खान मार्ग (वरळी सी फेस रोड), सेनापती बापट मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, प्रा. ना. सी. फडके मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग यासह अनेक महत्त्वाच्या मार्गांवरती हे दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (गेट-वे आॅफ इंडियाजवळील रिगल सिनेमाजवळ), वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो सिनेमा), हाजीअली जंक्शन, महाराणा प्रताप जंक्शन, कामगार रुग्णालय जंक्शन यांसारख्या महत्त्वाच्या चौकांमध्येही दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) संजय दराडे यांनी दिली आहे.मार्गावर दोन प्रकारचे फलक लावण्यात येणार आहेत. मोठ्या फलकाचा आकार हा ४.५ मीटर लांबी व १.८ मीटर उंची असणार आहे. ज्या खांबावरती हे मोठे फलक बसविण्यात येणार आहेत, त्या खांबाची उंची ७.८ मीटर एवढी असणार आहे. या प्रकारचे ९० मोठे दिशादर्शक फलक प्रामुख्याने रस्ते दुभाजकांवर खांब बसवून लावण्यात येणार आहेत. यापैकी काही फलक हे खांबाच्या एकाच बाजूला एकेरी पद्धतीने, तर काही फलक हे खांबाच्या दोन्ही बाजूला दुहेरी पद्धतीने असणार आहेत. या सर्व फलकांच्या पुढच्या बाजूला ठिकाणांची नावे असण्यासोबतच फलकाच्या मागील बाजूला जनजागृतीपर सामाजिक संदेश असणार आहेत. (प्रतिनिधी)>पहिल्यांदाच बसवले जाणार मोठे फलकमहापालिकेद्वारे एवढ्या मोठ्या आकाराचे दिशादर्शक फलक हे पहिल्यांदाच बसविले जाणार आहेत. तसेच हे फलक बसविण्यासाठी काही ठिकाणी क्रेनचाही वापर करावा लागणार आहे.मोठ्या आकाराच्या ९० दिशादर्शक फलकांची माहिती देण्यासाठी संबंधित पदपथांवर छोटे दिशादर्शक फलकदेखील लावण्यात येणार आहेत.या दिशादर्शक फलकांवर महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती मराठी व इंग्रजी भाषेत असेल. या फलकांचा आधारभूत रंग निळा असणार असून, अक्षरांचा रंग पांढरा असेल.फलक विशिष्ट प्रकारचे नटबोल्ट वापरून रस्ते दुभाजकांवर वा पदपथांवर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात फलक किंवा फलक बसविलेला खांब निरुपयोगी झाल्यास केवळ निरुपयोगी झालेला भाग बदलणे शक्य होणार आहे.दिशादर्शक फलक पुढील तीन महिन्यांत बसविणे अपेक्षित आहे. मात्र मेट्रो रेल्वेची कामे, विविध उपयोगितांच्या वाहिन्यांचे जाळे यामुळे दिशादर्शक फलक बसविण्याच्या वेळापत्रकात व स्थानात बदल होऊ शकतो.काही बाबतींत वाहतूक पोलीस व पुरातन वारसा जतन समिती यांचे ना-हरकत प्रमाणपत्रदेखील आवश्यक आहे.
मुंबईकरांचा ‘मार्ग’ होणार सोपा
By admin | Published: November 05, 2016 3:54 AM