ठाणे : शहरातील विविध भागांसह महापालिकेने मुंब्य्रातही रस्ता रुंदीकरणाचा कारवाई केली आहे. येथील बाधितांच्या बाबत कोणताही निर्णय न घेतल्याने दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, शिवसेनेच्या नेतेमंडळींनी सोमवारी आयुक्तांची भेट घेऊन बाधितांच्या पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांचे पुनर्वसन तत्काळ करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे राष्ट्रवादीने आंदोलन करण्यापूर्वीच शिवसेनेने त्याची हवाच काढून टाकली आहे.मागील आठवड्यात महापालिकेने मुंब्य्रातील अनेक भागात कारवाई करुन सुमारे ३ हजार बांधकामे जमीनदोस्त केली. शहरातील इतर ठिकाणी कारवाई करतांना तेथील बाधितांचे तत्काळ पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. परंतु, मुंब्य्राच्या बाबत तसा कोणताही निर्णय घेतला नसल्याचा ठपका ठेवून राष्ट्रवादीने बाधितांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यासाठी येत्या ७ जून रोजी आंदोलनाची हाक दिली होती. तसेच राष्ट्रवादीच्या मुंब्य्रातील नगरसेवकांनी बाधितांचे पुनर्वसन न झाल्यास राजीनाम्याचा इशाराही दिला होता. परंतु अवघ्या दोनच दिवसात शिवसेनेने राष्ट्रवादीच्या या होऊ घातलेल्या आंदोलनाची हवाच काढून टाकली आहे. मागील आठवड्यात मुंब्रा-कौसा आणि कळवा विभागात रस्ता रु ंदीकरण मोहिमेअंतर्गत प्रशासनाने धडक कारवाई केली होती. मात्र विस्थापितांचे पुनर्वसनाबाबत योग्य तो निर्णय प्रशासनाने जाहीर केला नव्हता. या संदर्भात विस्थापितांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून न्यायाची अपेक्षा केली होती. त्यांच्या सूचनेनुसार सोमवारी सकाळी महापौर संजय मोरे आणि स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. रस्ता रुंदीकरणात नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्याना वाऱ्यावर सोडता येणार नाही, त्यांचे तत्काळ व योग्य पुनर्वसन झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी महापौर आणि खासदारांनी आयुक्तांकडे केली. या मागणीवर सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कळवा-मुंब्रा, कौसा या भागात रस्ता रुंदीकरणात विस्थापित झालेल्या सर्वांचे तत्काळ पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी यावेळी दिली. तसेच यापुढेही कारवाईत आधी पुनर्वसन नंतरच कारवाई या पालकमंत्र्यांच्या सूचनेची प्रशासन निश्चितपणे अंमलबजावणी करेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केल्याचे महापौरांनी सांगितले. असे होणार पुनर्वसनमुंब्रा स्टेशन ते बायपास जंक्शन या टप्प्यामध्ये रस्ता रु ंदीकरणातंर्गत जवळपास १५८ व्यावसायिक बाधित गाळे तोडले होते. कौसा मार्केट येथे १३३ आणि सिमला मार्केट येथे ३९० एकूण ५२३ व्यावसायिक गाळे उपलब्ध आहेत. त्यामध्ये १९९७-१९९८ मधील बाधित लोकांचेही पुनर्वसन करण्यात येणार असून उर्वरीत व्यावसायिक गाळ्यांमध्ये गुलाब पार्क मार्केट येथील राजीव गांधी हॉकर्स युनियनने दिलेल्या यादीप्रमाणे त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये कपडे, कटलरी, भांडी, साबण विक्र ेते आदींना सिमला मार्केट येथे गाळे देण्यात येणार आहेत तर काही लोकांना कौसा मार्केट येथील उपलब्ध गाळे देण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाईमध्ये बाधित झालेल्या १५८ पैकी कोणीही मागणी केली तर शिल्लक असलेल्या गाळ्यामधील गाळे त्यांना वितरित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या आहेत.
मुंब्य्रातील बाधितांचे होणार पुनर्वसन
By admin | Published: May 17, 2016 4:10 AM