लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : येत्या २४ तासांत मान्सून राज्यात दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली असतानाच मुंबई महानगर प्रदेशात बुधवारी दुपारी सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने परिसराला अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पुन्हा जोर धरल्याने दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरासह ठाणे व नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली. दरम्यान, मान्सूनने ७ जूनचा मुहूर्त हुकवला असला तरीदेखील मान्सूनपूर्व पावसाने ७ जूनला मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनपूर्व पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दुपारीच मान्सूनपूर्व पावसाचे ढग दाटून आले होते. ठाण्यासह नवी मुंबईतदेखील दाटून आलेल्या पावसाच्या ढगांनी काळोख केला. दुपारनंतर चाहूल दिलेल्या पावसाने सायंकाळी फोर्ट, भायखळा, लालबाग, महालक्ष्मी, लोअर परळ, परळ, वरळी, दादर, सायन, कुर्ला, चेंबूर आणि वांद्रे परिसरात रिमझिम हजेरी लावली. सायंकाळनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. परंतु रात्री नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईत सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची अक्षरश: तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा, पाऊस अशा मिश्र वातावरणामुळे रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मुंबई महानगर प्रदेशाला झोडपून काढलेल्या पावसामुळे प्रदेशात चांगलाच गारवा निर्माण झाला होता.>मुंबईसाठी अंदाज८ व ९ जून : आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडेल.बुधवारी रात्री उशिरापर्यंत मुंबई महानगर प्रदेशाला झोडपून काढलेल्या पावसामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात चांगलाच गारवा निर्माण झाला होता.
पावसाने मुंबई चिंब
By admin | Published: June 08, 2017 6:55 AM