मनीषा म्हात्रेमुंबई : उत्तर प्रदेशातील गोदामातून चोरलेला शस्त्रसाठा थेट डोंगरीत उतरविण्यात येणार होता, अशी धक्कादायक माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. या शस्त्रसाठ्यामागे अंडरवर्ल्ड जगतातील कराची कनेक्शन समोर येत असल्याने मोठ्या घातपाताच्या शक्यतेतून तपास सुरू झाला आहे. सोमवारी एटीएसप्रमुखांनी सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस आयुक्तांसोबत भेट घेत चर्चा केली.शिवडीतील बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमीत उर्फ सुका उर्फ पाशा (२७) हा या कटामागील मुख्य सूत्रधार आहे. थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेल्या पाशाने ३५ जणांच्या साथीने लुटीचा कट रचल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातीलच चौघांना आतापर्यंत गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा, तसेच राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस), सीआययूच्या पथकाने चौकशी सुरू केली. सीआययूचे प्रमुख नाशिकमध्येच तळ ठोकून आहेत. त्यांनी केलेल्या चौकशीतून उत्तर प्रदेशातील गोदामातून मोठ्या प्रमाणात चोरी करून आणलेला शस्त्रसाठा मुंबईच्या डोंगरी परिसरात उतरविणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच परिसरालगत असलेल्या कामाठीपुरामधून गुन्हे शाखेने शुक्रवारी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अशात मुंबई गुन्हे शाखेने त्यांचा मोर्चा डोंगरीसह नागपाडा परिसरात वळविला आहे. एवढा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मुंबईत उतरवून नाताळ, थर्टीफस्ट तसेच २६ जानेवारी रोजी मोठ्या घातापाताच्या तयारीत ही मंडळी होती का, या दिशेने तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळाच्या कार्गोमधील शौचालयाच्या वॉलवर २६ जानेवारी रोजी मुंबईत घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामध्ये तेथील कर्मचाºयानेच ते लिहिले असल्याचे उघड झाले होते. मात्र त्याचाही या प्रकरणाशी काही संबंध असू शकतो का, ही बाब स्थानिक पथकाकडून पडताळण्यात येत आहे.अशातच एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सोमवारी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेतली. दोघांनाही आयबीचा तगडा अनुभव आहे. याचाच फायदा घेत याच प्रकरणाचे धागेदोरे ते शोधत आहेत. तसेच मुंबईत घातपाताचा कट होता का, याचीही चर्चा करण्यात आल्याचे समजते. मात्र याबाबत गुप्तता बाळगण्यात आली.
मुंबईत होता घातपाताचा कट? नाशिक शस्त्रसाठा प्रकरणाचे डोंगरी ते कराची ‘कनेक्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 3:41 AM