शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

मुंबईकरांचे आरोग्य उघड्यावरच...

By admin | Published: June 16, 2015 1:29 AM

अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरणाने मॅगीवर बंदी आणल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनानेही मॅगीवर कारवाईचा बडगा उगारून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरणाने मॅगीवर बंदी आणल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनानेही मॅगीवर कारवाईचा बडगा उगारून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र गेली अनेक वर्षे रस्त्यावर वडापाव व अन्य फास्ट फूड विकणारे अद्याप प्रशासनाला दिसले नसावेत. काही वर्षांपूर्वी अन्न सुरक्षा कायद्यात दुरुस्ती करून अन्न निरीक्षकांचे कारवाईचे अधिकारही वाढवण्यात आले. तरीही रस्त्यांवरील गाड्यांवर अद्याप निर्बंध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा गाड्यांवर मिळणारे पदार्थ किती हानिकारक आहेत व कायदा सक्षम असूनही कारवाई होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने ‘रिअ‍ॅलिटी चेक’च्या माध्यमातून उघडकीस आणले आहे.विशेष म्हणजे टीम लोकमत जेव्हा स्टॉल्सची माहिती घेण्यासाठी फिरत होती तेव्हा आमच्या प्रतिनिधींनाही अनेक वाईट अनुभव आले. काही ठिकाणी तर प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. स्थानिक गुंड आणि राजकारण्यांशी या स्टॉल्सधारकांचे संबंध असल्याने त्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. आमच्या छायाचित्रकारांनी हे फोटो कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर ते डिलीट करण्यासाठीही त्यांच्या भोवती स्टॉल्सधारकांनी गराडा घातला. अरेरावी आणि उद्दामपणाची भाषादेखील वापरली गेली. मुंबईत ठिकठिकाणी फास्ट फूड विकणाऱ्यांची गर्दी झाली आहे. यामध्ये वडापाव, चायनिज भेळ व पाणीपुरी याच्या विक्रीचे प्रमाण अधिक आहे. या गाड्यांकडे नीट पाहिले तर यांची मांडणी गटाराच्या बाजूलाच केलेली असते. कारण गाड्यांवर पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे पाणी व इतर टाकाऊ पदार्थ थेट गटारात टाकता येतात. यातील बहुतांश गाड्यांवर आजाराला आमंत्रण देणाऱ्या विषाणूंचा भरणा असतो. सतत घाईत असलेल्या मुंबईकरांच्या लक्षात या गोष्टी येत नाहीत, किंबहुना ते याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. या गाड्यांवर वापरले जाणारे पाणी, तेल व इतर पदार्थ असुरक्षित आणि कमी दर्जाचे असतात. हे पाणी असणारे कॅन व ड्रम कधीही न धुतल्यासारखेच असल्याचे रिअ‍ॅलिटी चेकमध्ये दिसून आले. या गाड्यांवर काम करणाऱ्यांचे कपडे बघितले तर तेही घाणेरडेच असतात. त्यामुळे त्यांची शारीरिक स्वच्छता तर लांबच राहिली आणि जेथे या गाड्या गटाराजवळ नाहीत तेथे तर रस्त्यावर भांडी धुण्याचे काम सुरू असते व तेथेच अन्न पदार्थ शिजवले जात असल्याचे रिअ‍ॅलिटी चेकमध्ये समोर आले. मुंबईतील प्रत्येक खाऊ गल्लीत असेच चित्र आहे. दादर, माटुंगा व इतर ठिकाणी असलेल्या खाऊ गल्लीत अस्वच्छताच दिसली.अन्न पदार्थ कसे शिजवावेत व ते शिजवणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी यासाठी अन्न प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित अन्न मिळेल याची काळजी घेण्याची जबाबदारी अन्न प्रशासनावर आहे. यासाठी अन्न निरीक्षक म्हणून स्वतंत्र पदही प्रशासनात आहे. अन्न निरीक्षक हॉटेलपासून अन्न मिळणाऱ्या प्रत्येक ठिकाणावर कारवाई करू शकतो. पण अशी कारवाई झाली आहे किंवा होणार आहे याचा कोणताच तपशील तूर्तास तरी अन्न प्रशासनाकडे नाही. त्यामुळे रस्त्यावर सर्रासपणे सुरू असलेल्या फास्ट फूडच्या गाड्यांकडे या विभागाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. तसेच मुंबईत फास्ट फूडच्या गाड्यांवर कारवाई होऊ शकेल, इतके मनुष्यबळही या विभागाकडे नाही. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेत सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेने तरुणांच्या रोजगारासाठी शिव-वडा सुरू केला. हा उपक्रम सुरू होण्याआधी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्या वेळी न्यायालयाने सुरक्षित व दर्जेदार अन्न विक्री करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची शिव-वडा किती अंमलबजावणी करतो, हाही एक प्रश्नच आहे. कारण शिव-वडाच्या काही गाड्या गटाराजवळच आहे. आता तर नितेश राणे यांनीही स्वाभिमानी वडा सुरू करत त्यात उडी घेतली आहे. आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे हे राजकीय पक्षही अशा गाड्या सुरू करण्यात मागे राहिलेल्या नाहीत. मात्र या गाड्यांवर मिळणाऱ्या अन्नाच्या सुरक्षेचे प्रमाण कोण घेणार, असा प्रश्नच आहे. आणि मुंबईतील प्रत्येक अवैध फास्ट फूड गाडीला स्थानिक राजकीय बळ असते व हफ्ता घेऊन पोलीसही याकडे कानाडोळा करतात.यातील आश्चर्यकारक बाब म्हणजे पालिकाच अशा गाड्यांवर कारवाई करते. या गाड्या दंड भरून पुन्हा सोडवता येतात. पण पुन्हा या गाड्या उभ्या राहणार नाहीत, हे तपासण्यासाठी पालिकेकडे यंत्रणाच नाही. तरीही पालिका काही दिवसांआड कारवाई करतच असते. आणि आजार वाढले की कशी काळजी घ्यावी याची जाहिरात करायलाही पालिका लाखो रुपये खर्च करते. मात्र आजार पसरवणाऱ्या गाड्यांवर ठोस कारवाईचा कार्यक्रम पालिकेकडे नाही.अन्न निरीक्षकांचे व पालिकेचे दुर्लक्ष यामुळे गेली अनेक वर्षे मुंबईच्या रस्त्यांवर सर्रासपणे दूषित अन्न विकले जात आहे. मॅगीच्या कारवाईनंतर तरी अन्न प्रशासन व पालिका या गाड्यांवर निर्बंध आणणार का, असा प्रश्न आहे. कोणते आजार उद्भवू शकतात?बटाटे वडा, कांदा भजी : पावसाळ्यात अनेकांना गरमागरम तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. यावेळी रस्त्यावरची भजी, वडे खाण्यास पसंती मिळते. पण, रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या वडे, भजीसाठी वापरण्यात येणारे तेल चांगल्या प्रतीचे नसते. एकच तेल अनेकदा उकळून वापरतात, काही वेळा शिळे तेल वापरतात. अशा प्रकारे तेलातील स्निग्धांचे प्रमाण वाढते. यामुळे गळ््याला सूज येते, घसा खवखवणे, छातीत जळजळते, मळमळणे असा त्रास होतो. शरीरातील चरबी वाढते.चायनिज भेळ : सध्या रस्त्यांवर विकले जाणारे चायनिज भेळ, मंचुरीयन हे पदार्थ आरोग्यास अतिशय घातक आहेत. यात वापरण्यात येणारे खाद्यपदार्थ किती तरी दिवस साठवलेले असतात. यात अनेक प्रकारच्या चटण्या आणि रंग वापरण्यात येतात. अनेकदा या स्टॉलवर वापरण्यात येणारे पाणी अस्वच्छ असते. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. वापरण्यात येणाऱ्या चटण्यांमुळे पित्त होऊ शकते. पाणीपुरी, रगडा पुरी : पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारे पाणी अशुद्ध असल्यास पोटाचे आजार होतात. अशुद्ध पाण्यात अमिबासारखे जीवाणू असतात. रगडा त्याच पाण्यात शिजवलेला असेल, पाणी पुरीसाठी तेच पाणी वापरले असेल तर हगवण, उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो, कावीळ असे आजार होऊ शकतात. मुंबईकरांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी गाड्यांवरच्या खाद्यपदार्थांची निमयमित तपासणी केली जाते. तिथे काही अयोग्य प्रकार होत असल्याचे आढळून आल्यास त्यांना नोटीस पाठविली जाते. एखादी तक्रार आल्यास त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली जाते. नोटीस दिल्यानंतरही त्या ठिकाणी कोणताही बदल झाला नाही, तर त्यावर कारवाई केली जाते. त्यांना २५ हजारांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. आत्तापर्यंत किती कारवाया झाल्या याच्या निश्चित आकडेवारीची नोंद नसल्याचे एफडीए अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. ताटल्या कशा धुतात? ग्राहकाला दिल्या जाणाऱ्या ताटल्या, चमचे अस्वच्छ असतात. एका बादलीत साबणाचे पाणी आणि दुसऱ्या बादलीत साधे पाणी ठेवलेले असते. वापरलेली ताटली, चमचे एकदा साबणाच्या पाण्यात बुडवली जाते, नंतर साध्या पाण्यात बुडवून बाहेर काढली जाते. आणि एका अस्वच्छ फडक्याने त्या पुसल्या जातात. दिवस दिवस ते फडके बदलले जात नाही. घरचे पदार्थ खा...उघड्यावरचे पदार्थ कोणत्याही ऋतूत खाणे हे आरोग्यास हानिकारकच आहे. पण, पावसाळ््यात उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाल्यास आजारी पडण्याचा धोका वाढतो. उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसतात. पाणी उकळून, गाळून घेतलेले नसते. गाड्यांवर वापरण्यात येणाऱ्या भांड्याचे, कपड्यांचे निर्जंतुकीकरण केलेले नसते. गाड्यांच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असतो. एकूणच परिस्थितीचा विचार केल्यास जंतूसंसर्ग होऊन आजारी पडण्याचा धोका अधिक आहे. यामुळे पावसाळ््यात घरचे उकळलेले पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा. - डॉ. अनिल पाचणेकर, फॅमिली फिजिशियन आरोग्य विभागातर्फे कारवाईउघड्यावर अन्न शिजवणाऱ्या गाड्यांमुळे अतिसार, कावीळ, टायफॉइड, गॅस्ट्रो असे आजार पसरतात़ त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग, आरोग्य व परवाना या विभागांमार्फत कारवाई केली जाते़उघड्यावरील अन्न पदार्थांमुळे होणारे आजार घसा दुखणे, घशाला संसर्ग होणे, छातीत जळजळणे, मळमळणे, खोकला, पित्त होणे, कफ, सर्दी, विषाणूजन्य ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, पोटात दुखणे, पोटात संसर्ग होणे, हगवण, जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो, टायफॉइड, कावीळ, कॉलरा, आतड्यांना संसर्ग होणे.रस्त्यावर हे सगळेच मिळते... पाणीपुरी, भेळ, शेवपुरी, इडली, वडा, डोसा, कचोरी, समोसा, पुलाव, सॅण्डविच, फ्रॅन्की, पिझ्झा, स्प्रिंगरोल, पावभाजी, बुर्जीपाव, मिसळपाव, दाबेली, चायनिज भेळ, मंचुरीयन, फ्राइडराइस, वजरीपाव, उकडलेले अंडे, सीग पराठा, सल्ली बोटी, डबा गोश्त असे सर्वच पदार्थ रस्त्यावर विकले जातात.