ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - 31 जानेवारीला मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक आचारसंहितेमुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील जिल्हावार मोर्चाच्या संयोजकांची बैठक १५ जानेवारीला दादर येथे आयोजीत केली आहे. संयोजकाच्या बैठकित मुंबईतील मोर्चाची तारिख ठरण्याची शक्यता आहे. मुंबईत झालेल्या मराठा मुक मोर्चासंदर्भातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मुंबई 31 जानेवारी रोजी मराठा क्रांती महामोर्चा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
मुंबईतील दामोदर हॉल, परळ(पू) येथे पार पडलेल्या नियोजन बैठकीत मुंबई जिल्हा तसेच इतर संलग्न जिल्ह्यातून तालुका प्रतिनिधी व संघटना प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थीती दर्शवली. ह्याच वेळी महामोर्चा का काढायचा ह्याबाबत औरंगाबाद येथे उपस्थीत असलेल्या प्रतिनिधिंना मुंबईतील मराठा बांधवांनी विचारणा केली असता त्यांनाही ह्या तारखेच्या समर्थनार्थ योग्य ती कारणमीमांसा करता आली नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या महामोर्चाची तारीख तुर्तास स्थगित करण्यात आली आहे.
राजकीय पक्षांचा समावेश नको!मराठा क्रांती मुक मोर्चामधील औरंगाबादच्या समन्वयकांमधील काही प्रतिनिधींनी शिवसेनेसोबत हातमिळवणी केल्याची जोरदार चर्चा रविवारी रंगली. भारतीय जनता पक्षाला मात देण्यासाठी मराठा समाजाच्या माध्यमातून शिवसेना ही खेळी खेळत असल्याचा आरोपही काही समन्वयकांनी केला. मात्र थेट शिवसेनेवर कोणताही आरोप न करता समन्वयक-प्रतिनिधींनी राजकीय पक्ष बाजूला सारून १५ जानेवारीला होणाऱ्या राज्यव्यापी बैठकीत सामील होण्याचे आवाहन मुंबईच्या समन्वय समितीने केले आहे.