ऑनलाइन लोकमत
मुंबई , दि. 18 - मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी नवनवीन प्रयोग एकीकडे सुरु असताना खड्ड्यांसाठी कारणीभूत असलेले चर खोदण्याची परवानगी पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा दिली आहे़ पावसाळा संपताच विविध उपयोगिता सेवा कंपन्या खोदकाम सुरु करणार आहेत़ त्यामुळे पुढच्या पावसाळ्यातही मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यांतूनच होणार आहे़ दरवर्षी सुमारे चारशे कि़मी़ हून अधिक खोदकाम मुंबईत होत असते़ गेल्या आॅक्टोबर ते मे या कालावधीत ६०० कि़मी़ रस्ते खोदण्यात आले होते़ गॅस, वीजपुरवठा, मोबाईल कंपन्या अशा ३२ सेवा कंपन्या केबल टाकण्यासाठी असे चर खणतात़.
मात्र हे चर बुजविताना नियमांचे पालन होत नाही़ त्यामुळे रस्ता असमतोल होत असल्याने चर खोदण्यावर निर्बंध आणण्याची तयारी पालिकेने केली होती़ टाकण्यात येणारे नवीन केबल, त्यासाठी खोदावे लागणारे चर या नियोजित कामांचा आराखडा सादर करण्याची सक्ती महापालिकेने केली आहे़. हा आराखडा सादर करण्यास विलंब करणाऱ्या कंपनीकडून चर बुुजविण्याच्या रक्कमेच्या सात ते १५ टक्के दंड आकारण्याचा इशाराही देण्यात आला़ मात्र स्थानिक विभाग कार्यालयातील अभियंत्यांकडून या कामावर देखरेख ठेवण्यात कुचराई होत असल्याने चरामुळे रस्त्यांचे आकार बिघडू लागले आहेत़.
चर भरताना रस्ता समतोल होईल, पुन्हा त्या ठिकाणी खड्डा पडणार नाही, याची जबाबदारी वॉर्डस्तरावरील रस्ते अभियंत्यावर सोपविण्यात आली आ
रस्ते विभाग आणि वॉर्डस्तरावरील अभियंत्यांमध्ये समन्वय नसल्याने नवीन रस्तेही खोदले जात आहेत़ त्यामुळे रस्ते रुंदीकरण, काँक्रिटीकरण या प्रकल्पांचा अंदाज घेऊन त्यानंतरच चर खोदण्याचे नियोजन करावे, असे निर्देश वॉर्डातील अभियंत्यांना देण्यात आले आहेत़
खोदलेल्या रस्त्यांच्या स्थितीचा साप्ताहिक अहवाल रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता, दक्षता आणि अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे यांना सादर करावा असे आदेश कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत़.