ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ : अवघ्या दहा दिवसांच्या पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याचे आरोप होत आहेत. खड्डयांवरुन महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपावर टीका होत आहे. महापालिकेने मात्र खड्डयांचा हा आरोप फेटाळून लावत मुंबईत अवघे ६८ खड्डे असल्याचा दावा केला. त्यामुळे मुंबई काँग्रेसने खड्डयांची आॅनलाईन चळवळ सुरु करण्याची घोषणा केली असून जिथे खड्डे दिसतील तेथील फोटो व्हाटस् अप, ट्विटर आणि ईमेलच्या माध्यमातून पाठविण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे. खड्डयांसंदर्भात आॅनलाईन फोटो चळवळीबाबत बोलताना मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, दहा दिवसांच्या पावसात मुंबईतील रस्त्यांची दैना उडाली आहे. या खड्डयांमुळे मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेचे रस्त्यांसाठीचे दरवर्षीचे बजेट तब्बल ३५०० कोटी आणि दुरुस्तीचे २५०० कोटी इतके प्रचंड आहे. तरीही दर पावसाळ्यात मुंबईकर खड्डयांमुळे हैराण होतात. सत्ताधारी शिवसेना भाजपा केवळ पैसे खाण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी काँग्रेसने ह्यबोल मेरे पॉटहोल बोलह्ण अशी आॅनलाईन चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांनी महापालिकेच्या कारभाराविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. एखादी चळवळ उभारल्याशिवाय युती सरकार जागे होणार नाही. रस्त्यांच्या कामात प्रचंड गैरव्यवहार झाला आहे. एकीकडे मुंबईक खड्डयांनी त्रस्त झालेले असताना सरकार मात्र मुंबईत फक्त ६८ खड्डे असल्याचा दावा करीत आहे. या खोट्या आकडेवारी विरोधात मुंबईकरांनी एकत्र यावे. जिथे जिथे खड्डे दिसतील तिथले फोटो काढून आम्हाला व्हाट्स अँप, ईमेल किंवा ट्विटर करावेत. प्रत्येक नागरिकाने आपापल्या विभागातील खड्ड्यांचे फोटो आम्हाला ताबडतोब पाठवावेत, असे आवाहन निरुपम यांनी केले.