मुंबई : वादळी लाटा, त्सुनामीसारख्या तडाख्यांपासून कोस्टल रोड शहरांचे रक्षण करण्याचे काम करतात. त्यादृष्टीनेच जगभरात नव तंत्रज्ञानाचा वापर करत कोस्टल रोडची निर्मिती केली जाते. मुंबईतील कोस्टल रोडही वादळी लाटांपासून शहराचे रक्षण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत व्यक्त केला.कोस्टल रोड प्रकल्पामुळे बाधित कोळी बांधवांच्या पुनर्वसनाबाबत काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या विद्या चव्हाण यांनी समुद्राच्या लाटांच्या तडाख्याचा कोस्टल रोडवर काही परिणाम होईल का, असा सवाल उपस्थित केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. कोस्टल रोड हा शहराचे संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावेल असे मुख्यमंत्री म्हणाले. नेदरलँडचे प्रधानमंत्री भारत भेटीवर आले असता त्यांनी कोस्टल रोडबाबत सादरीकरण दिले होते. मुंबईतील कोस्टल रोडबाबत राज्य सरकारने त्यांच्याशी करार करावा, अशी त्यांची अपेक्षा होती. समुद्राच्या उंचच्या उंच लाटा थांबवण्यासाठी कोस्टलच्या रोडच्या पलीकडे नवीन तंत्रज्ञान वापरून बंधारे बांधता येऊ शकतात. त्यामुळे कोस्टल रोड भविष्यात वादळी वा-यांपासून तसेच सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यापासून शहराचे संरक्षण करू शकेल असे नेदरँडच्या पंतप्रधानांनी त्यावेळी सांगितले होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोस्टल रोडमुळे वरळी आदी भागातील पदपथ काही प्रमाणात तोडावे लागले. कोस्टल रोड तयार करताना आताचे रस्ते आणि कोस्टल रोड यांमध्ये मोठी जागा सोडण्यात येईल.केंद्र सरकारने या जागेत कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करण्याची अट ठेवली आहे. त्यानुसार सीआरझेड लाईनला कुठल्याही प्रकारचा धक्का लावण्यात येणार नाही. या जागेत कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले जाणार नाही. या जागेत हिरवळ तयार करण्यात येईल. त्यामुळे मुंबईला नवे फुफ्फुस मिळेल. - देवेंद्र फडणवीस
'वादळी लाटांच्या तडाख्यातून कोस्टल रोडमुळे मुंबईचा बचाव'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 2:33 AM