मुंबई : भर दुपारी उन्हातून चालताना अवती-भवती असणाऱ्या सावलीने रविवारी दुपारी मुंबईकरांची साथ सोडली होती.भर दुपारी सूर्याच्या विशिष्ट स्थितीमुळे सावली बरोबर पायाखाली आल्यामुळे दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी ‘शून्य सावली’चा अनुभव अनेक मुंबईकरांनी घेतला. रविवारी सावली गायब झाल्याचा अनुभवही मुंबईकरांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. रविवार सुट्टीचा दिवस असूनही मुंबईकरांनी दुपारी घराबाहेर पडून ‘शून्य सावली’चा अनुभव घेतला. असाच अनुभव मुंबईकरांना १५ नोव्हेंबर रोजी घेता येणार आहे. सूर्याची क्रांती ज्या वेळी आपण राहतो, त्या ठिकाणच्या अक्षांशाएवढी होते. त्या वेळी त्या ठिकाणी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर आल्यावर आपली सावली अदृश्य होते. ही गोष्ट उत्तर २३.५ अक्षांशापलीकडच्या प्रदेशात आणि दक्षिण २३.५ अक्षांशा पलीकडच्या प्रदेशात घडत नसल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुंबईकरांची सावली ‘गायब’
By admin | Published: May 16, 2016 2:45 AM