ठाणे : ठाणे महापालिकेच्या १० प्रभाग समित्यांपैकी सात प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध निश्चित असतांना तीन प्रभाग समित्यांसाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. यात मुंब्रा प्रभाग समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने शिवसेना आणि मनसेची मदत घेतली असली तरी त्यांच्यातील एक नगरसेवक गैरहजर राहणार असल्याने ही प्रभाग समिती आता पुन्हा राष्ट्रवादीला जाण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अनोख्या खेळीला त्यांच्याच गटातील अपक्ष नगरसेवकाने खीळ घातल्याची चर्चा सुरु आहे.महापालिकेच्या १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज आले आहेत. यातील सात प्रभाग समित्यांवर अध्यक्षांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. परंतु कोपरी, माजिवडा मानपाडा आणि मुंब्रा प्रभाग समितीमध्ये दोन - दोन उमेदवार आमने सामने आल्याने, या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने माघार घेतल्याने तेथे काँग्रेसच्या मालती पाटील यांनी आणि मनसेतून राजश्री नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनसेला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने ही प्रभाग समिती मनसेच्या वाटेला जाणार असे निश्चित झाले आहे. दुसरीकडे माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादीच्या उषा भोईर आणि शिवसेनेच्या बिंदु मढवी यांचा अर्ज दाखल झाला आहे. येथे शिवसेनेचे सहा नगरसेवक असून राष्ट्रवादीचे चार, एक अपक्ष आणि एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. अपक्ष हा राष्ट्रवादीच्याच बाजूने असला तरी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांचे मत येथे निर्णायक मानले जात असून ते शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील, अशी माहिती काँग्रेसच्याच सूत्रांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादीने जबरदस्तीने हिसकावलेल्या मुंब्रा समितीच्या चाव्या पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने येथे रेश्मा पाटील यांना मैदानात उतरविले आहे. तर राष्ट्रवादीने पुन्हा अशरफ उर्फ शानु पठाण यांना रिंगणात उतरविले आहे. (प्रतिनिधी)
मुंब्रा प्रभाग समिती राष्ट्रवादीकडे?
By admin | Published: April 29, 2016 4:09 AM