- शिवाजी पवार शिर्डी : अजित पवार गटाचे दोन दिवस चाललेले अजित पर्व नवसंकल्प शिबिर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व मंत्री धनंजय मुंडे यांच्याच भोवती अधिक फिरले. दोघांच्याही शिबिरातील उपस्थितीवर शंका घेतली जात होती. मात्र ते आल्याने बरे झाल्याची भावना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलून दाखविली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या शिबिरातील भाषणामुळे त्यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर शिर्डीत दोन दिवस पक्षाचे शिबिर पार पडले. समारोपाच्या सत्रामध्ये उपमुख्यमंत्री पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे व प्रफुल्ल पटेल यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिला. फुले, शाहू, आंबेडकर यांच्याच विचारांवर पक्षाची वाटचाल सुरू राहील. धर्मनिरपेक्ष विचारांशी कोणतीही तडजोड केली जणार नाही, याचा पुनरुच्चार तीनही नेत्यांनी केला.
‘त्या’ महिलांबाबत विचारलाडकी बहीण योजना ही गोरगरीब घटकातील महिलांना डोळ्यांसमोर ठेवून सुरू केली. मात्र करदाते, नोकरदार तसेच ऊस उत्पादक महिलांबाबत वेगळा विचार करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महामंडळांवर नियुक्त्याविविध महामंडळांवर लवकरच नियुक्त्या केल्या जातील. त्यासाठी राष्ट्रवादीकडून तटकरे, भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, तर शिंदेसेनेकडून उदय सामंत एकत्रित बसून निर्णय घेतील, असेही अजित पवार म्हणाले.
‘मी अभिमन्यू नाही, अर्जुन’ बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकविण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यात त्यांना यश येणार नाही. कारण मी अभिमन्यू नाही, तर मी अर्जुन आहे, अशा शब्दांत मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणावर भाष्य केले. महायुतीतील नेत्यांकडूनच मला टार्गेट केले जात असल्याचे वाईट वाटते. मात्र, वस्तुस्थितीची जाणीव असल्याने पक्ष म्हणून अजित पवार माझ्या पाठीशी उभे आहेत. २०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका, हे षड्यंत्र आहे, हे मी अजित पवार यांना सांगितले होते. शपथ त्यांनी घेतली, पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंतही मुंडे यांनी व्यक्त केली.