ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १५ - गर्भलिंग निदानप्रकरणी आणि स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी डॉ. सुदाम मुंडे व डॉ. सरस्वती मुंडे या दोघांनाही चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. याखेरीज गर्भलिंग चाचणीसाठी सहा महिन्याची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अनेक कोवळ्या व निरागस जीवांचे आयुष्य संपवणा-या मुंडे दांपत्याला परळी कोर्टाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एल. जी. पाचे यांनी ही शिक्षा सुनावली.
अवैध गर्भलिंगनिदान चाचणी केल्याप्रकरणी मुंडे दांपत्याविरोधात सध्या न्यायालयात तीन खटले सुरू आहेत. त्यापैकी कागदपत्रात अनियमितता असल्याच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना ही सहा महिन्यांची शिक्षा झाली आहे. तर स्त्रीभ्रूण हत्येसाठी चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे.
मुंडे यांच्या रुग्णालयात २०१२ साली एका महिलेची गर्भलिंगनिदान चाचणी करण्यात आली असता पोटातील बाळ मुलगी असल्याची स्पष्ट झाले. त्यावेळी डॉक्टरने कुठलाही रेकॉर्ड न ठेवता सरळ गर्भपात केला व त्यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण खूप तापले आणि पोलिसांनी परळी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवध तसेच अवैध गर्भलिंगनिदान चाचणी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास केला असता डॉ. मुंडे यांनी याआधीही अनेक गर्भपात करून ती अर्भके प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून स्वत:च्या शेतातील पडक्या विहीरीत टाकल्याचे समोर आले.
या गुन्ह्याप्रकरणी अंबेजोगाई सत्र न्यायालयाने जामीन दिला होता मात्र डॉ. सुदाम मुंडेचा जामीन न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर सरस्वती मुंडेचा जामीन रद्द करण्याशाठी शासनातर्फे खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली व खंडपीठाने सरस्वतीचा जामीन रद्द केला.