मुंबई : आदिवासींच्या आर्थिक विकासासाठी मोहाच्या फुलांपासून वायनरी उद्योगाला प्रोत्साहन द्या, असे सांगत विरोधक व सत्ताधारी आमदारांनी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘मोहात’ पाडण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु चंद्रपुरात दारूबंदी करणारे मुनगंटीवार वायनरीच्या मोहापासून चारहात दूरच राहिले. विदर्भातील आदिवासीबहुल अतिदुर्गम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मोहफुले येतात. त्यामुळे आदिवासींना उत्पन्न मिळावे, यासाठी या फुलांवरील बंदी उठवा, अशी मागणी करणारी लक्षवेधी संजय पुराम, डॉ. देवराम होळी, कृष्णा गजबे, राजेश काशिवार आदी सदस्यांनी लावली होती. त्यावर बोलताना वनमंत्री म्हणाले, मोहफुलावर वनविभागाने बंदी घातलेली नाही. मोहफुले वेचणे, जमा करण्यावर बंदी नाही. मात्र त्याची एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करायची असेल तर १०० रुपये प्रति टन एवढे शुल्क राज्य उत्पादन विभागातर्फे आकारले जाते. याविषयी त्या विभागाशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले. वायनरी काढण्याची आवश्यकता नाही असे सांगून ते म्हणाले, ३३ प्रकारच्या वनउपजांचे फेडरेशन केले जाईल. त्यात व्हॅल्यू अॅडीशन करून त्याला उद्योगाचे रूप कसे देता येईल याचा विचार केला जाईल. आंबा, सफरचंद याहीपेक्षा मोहफुलात न्यूट्रीशन व्हॅल्यू जास्त आहे. त्यादृष्टीने हे फेडरेशन विचार करेल.
मुनगंटीवारांनी ‘मोह’ आवरला!
By admin | Published: April 10, 2015 4:15 AM