मुंबईः विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपात प्रवेश केल्यावरून मुनगंटीवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला हाणला, त्याला अजित पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेला आम्ही फसवलंय, पण त्याचा फायदा तुम्ही घेऊ नका. सेना एवढी संमोहित झालीय की, त्यांना काहीच दिसत नाही. तसेच आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच, असे सांगत मुनगंटीवारांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तोच धागा पकडत अजितदादांनी मुनगंटीवारांवर पलटवार केला. सुधीर मुनगंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली. पण आता चुकीला माफी नाही, असं अजितदादा म्हणाल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.तसेच 'दगडी चाळ' चित्रपटातील 'चुकीला माफी नाही' हा डायलॉग आज विधानसभेत जोरदार घुमला. विशेष म्हणजे अजित पवारांनी चुकीला माफी नाही, असं म्हटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही मान हलवून त्याला अनुमोदन दिलं. इकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तिकडे (भाजप) होणार नाही याची काळजी घ्या, असा उपरोधिक सल्लाही अजितदादांनी मुनगंटीवारांना दिला आहे. त्यानंतर लागलीच मुनगंटीवारांनी अजित पवारांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. सुधीर मुनगंटीवार यांनी थेट त्यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली. या दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्यानंतर अजित पवारही आक्रमक झाले. "मी शपथ घेतली मान्य करतो. मी काही लपून करत नाही, तिथे गेलो, ते सोडून इथे आलो आणि आता मी इथे मजबूत बसलोय, असं म्हणत अजित पवारांनीही मुनगंटीवारांनाही खडे बोल सुनावले.
मुनगंटीवार म्हणाले, 'आम्ही शिवसेनेला फसवलं'; अजितदादा म्हणतात; 'चुकीला माफी नाही'!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 3:16 PM