ठाणे : काही महिन्यांवर आलेल्या ठाणे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची तयारी आतापासूनच इच्छुकांनी सुरु केली आहे. दिवाळीपूर्वी प्रत्येकाच्या दारात उटणे, पणत्या, शुभेच्छापत्र दिल्यानंतर आता फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून इच्छुकांचा प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. काही पक्षांनी तर फेसबुकवर पाच वर्षात केलेल्या कामांचे व्हिडिओदेखील अपलोड केले आहेत. इच्छुकांचे कार्यकर्तेदेखील आपल्या आवडत्या उमेदवाराचा प्रचार करण्यात आघाडीवर आहेत. मात्र, यामुळे मतदार राजा हैराण झाला असून त्यांची डोकेदुखी येत्या काळात आणखी वाढणार आहे.ठाणे महापालिका निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. सध्या या पक्षातून त्या पक्षात उडी मारणाऱ्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे पूर्वी ज्या पक्षात होते, त्या पक्षाचे बॅनर आता उतरले जात असून नव्याने ज्या पक्षात प्रवेश केला असेल त्यानुसार त्या पक्षातील नेतेमंडळींचे फोटो असलेले बॅनर आता शहरभर लागू लागले आहेत. त्यातच मतदारांना आर्कषित करण्यासाठी काही इच्छुकांनी दिवाळीपूर्वी त्यांच्या दारात उटणे, पणत्या आणि शुभेच्छापत्र देऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. आता त्यातही पुढे जाऊन इच्छुक उमेदवारांनी थेट फेसबुकच्या माध्यमातून प्रभागासाठी केलेल्या कामांचा पाढा वाचण्यास सुरवात केली आहे. केलेल्या कामांचे फलक, करीत असलेल्या कामांचे फलकांसह छोटेखानी वचननामा आणि कार्यअहवालदेखील या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. विशेष म्हणजे मागील चार वर्षे मृतावस्थेत असलेले काही इच्छुकांचे किंबहुना काही बड्या राजकीय मंडळींचे फेसबुक पेजही आता निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जिवंत झाले आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही नवे उपक्रम, नव्या कामांची यादी, केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी या पेजला देखील उर्जिीतास्था प्राप्त होऊ लागली आहे. यातून आपल्या नेत्याला आकर्षित करुन तिकीट पक्के करण्यासाठी फेसबुकचा आधार इच्छुक घेऊ लागले आहेत. >प्रभागातील मतदारांच्या डेटाबेसचा वापरव्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही इच्छुकांची प्रचाराची घौडदौड सुरु आहे. आपल्या प्रभागातील मतदारांचा फोनचा डेटा गोळा करण्यात आला असून त्या माध्यमातून आता प्रत्येकाच्या मोबाइलवर सध्या दिवाळींच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. सोबत आपला फोटो आणि कामांची यादीही टाकली जात आहे.
पालिका प्रचाराचा दिवाळी धमाका
By admin | Published: November 02, 2016 3:03 AM