पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या निर्धार दिनी पहिल्याच दिवशी झाडू हातात घेऊन कर्मचारी व शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यामुळे आता पनवेलकरांना लवकरच ‘स्वच्छ व सुंदर पनवेल’ पहायला मिळेल, अशी अशा बाळगायला हरकत नाही.शनिवारी पनवेल महानगरपालिका स्थापन झाली. तर महापलिकेचे पहिले आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांनी सायंकाळी सूत्रे स्वीकारली. रविवारी, महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानात त्यांनी सहभाग घेतला. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून स्वच्छता मोहिमेला सुरु वात करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत उपस्थित होते. आयुक्त सुधाकर शिंदे स्वत: झाडू घेऊन रस्त्यावर उतरले. एस.टी. डेपो जवळील महामार्गावर आयुक्त स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या निर्धार दिनाच्या मोहिमेत उप आयुक्त मंगेश चितळे, सहाय्यक आयुक्त खाडे, उपसचिव भोसले यांचेसह बांधकाम विभाग, स्वच्छता विभाग, आरोग्य विभागासह सर्व विभागाचे कर्मचारी सामील झाले होते. पनवेल विभागातून कामाला सुरु वात करून,नवीन पनवेल, खांदा वसाहतीनंतर नव्याने सामील झालेल्या ग्रामीण भागात आठवडाभर ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी संगितले. यावेळी खांदा कॉलनीतील प्रेरणा सोसायटीतील लोकांनी पुढे येऊन आम्ही आपणाला सहकार्य करण्यास तयार असल्याचे आयुक्तांना सांगितले.>स्वच्छता निर्धार मोहिमेत शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेत ग्रामीण भाग ही मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची माहिती देण्यात येणार आहे. लवकरच कचरामुक्त पनवेल पाहायला मिळेल.-डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल >आयुक्तांना हातात झाडू घेऊन रस्त्यावर सफाई करताना पाहिल्यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. त्याचा परिणाम एस.टी. डेपोसमोरील पुलाखालचा परिसर काही वेळातच स्वच्छ झाला. आयुक्तांच्या निर्धाराला सर्व कर्मचाऱ्यांची साथ असल्याचे दिसून येत आहे. - मंगेश चितळे, उप आयुक्त, पनवेल >पेण झाले हागणदारीमुक्तपेण : स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत पेण शहर हागणदारीमुक्त झाले आहे. तसा संदेश पेणचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नगरपरिषदेला दिला आहे. त्यामुळे वर्षभर स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील सहभागी झालेल्या प्रशासन, शाळा, महाविद्यालय, प्रशाला, महिला बचत गट व स्वच्छता कर्मचारी, गुड मॉर्निंग पथक, प्रशासनाचे लोकप्रतिनिधी व विभागीय अधिकारी यांच्या रविवारी, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्याचे माजी मंत्री रवींद्र पाटील व नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पेण नगर परिषद हागणदारीमुक्त झाल्याने राज्याचे १ कोटी प्रोत्साहन पर अनुदानापैकी ३० लाख प्राप्त तर ७० लाख रुपये लवकरच मिळणार असल्याचे जीवन पाटील यांनी सांगितले. अलिबाग : निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ भारत अभियानात समाजातील सर्व घटकांनी सहभाग घेण्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केले. गांधी जयंतीनिमित्त अलिबाग समुद्र किनारा व परिसर स्वच्छ करण्याच्या विशेष स्वच्छता मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, सर्जेराव सोनावणे, प्रकाश संकपाळ, डॉ. राजू पाटोदकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.गीते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करून देशात एक चळवळ उभी केली व स्वच्छ भारताचा नारा दिला. स्वच्छतेची आवड व सवय निर्माण व्हावी यासाठी हे अभियान होत आहे. एकदा का स्वच्छतेची सवय व आवड निर्माण झाली तर त्या अनुषंगाने आपले घर, परिसर, शहर, राज्य आणि राष्ट्र स्वच्छ होईल, पर्यायाने हे अभियान यशस्वी ठरेल. स्वच्छ भारत अभियान कोणत्याही एखाद्या पक्षाचे नसून सर्व समाज घटकांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या आयुक्तांनी दिला स्वच्छतेचा मंत्र
By admin | Published: October 03, 2016 3:23 AM