इंदुमती गणेश--कोल्हापूर --‘शास्त्रीय संगीत ही दैवी शक्ती आहे. त्यातील ‘सा’ कळायलाही आयुष्य जाते. सुरांना आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे. आयुष्यभर मी दैवी अस्तित्वाची ही कला जोपासली,’ या शब्दांत संगीतपरंपरेचा अभिमान व्यक्त करणाऱ्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्यासाठी कोल्हापूर म्हणजे त्यांच्या गायकीचे माहेर. त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर या कोल्हापूरचे राजदरबारी गायक उस्ताद अल्लादिया खाँ यांच्या शिष्या. मूळच्या कोल्हापूरच्या जयपूर अत्रौली घराण्याच्या रागदारी गायकीचे सूर पहिल्यांदा त्यांनी कोल्हापूरच्या रंगमंचावर आळविले. राजर्षी शाहू महाराज यांनी उस्ताद अल्लादिया खाँ यांची दरबारी गायक म्हणून नियुक्ती केली होती. किशोरीतार्इंचा आई मोगूबाई कुर्डीकर या उस्ताद अल्लादिया खाँ व हैदर खाँ यांच्या थेट शिष्या. उस्ताद अल्लादिया खॉँ यांची जयपूर घराण्याची मूळ गायकी असल्याने किशोरीताई या शहराला आपले ‘गानमाहेर’ मानायच्या. मोगुबार्इंच्या शिस्तीत शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेल्या किशोरीताई आईच्या मागे बसून गाणं शिकल्या. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे त्यांनी बंदिशीचे धडे घेतले. खर्डेकर बोळात बापूसाहेब करमरकर यांच्याकडे त्या बऱ्याचदा मुक्कामाला असायच्या. गायन समाज देवल क्लबमध्ये त्यांनी बालपणापासून अनेक मैफली गाजविल्या. ‘नाव व पैसा मिळणारे संगीत गाऊ नकोस,’ ही आईने दिलेली शिकवण पाळत त्यांनी शास्त्रीय संगीताचा वैश्विक विचार केला. माझं माहेर असलेल्या कोल्हापूरच्या उस्ताद अल्लादिया खाँ यांच्या संगीतपरंपरेचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत त्या कोल्हापूरबद्दलचे प्रेम व्यक्त करत. कोल्हापूरची गानपरंपरा आणि गायन समाज देवल क्लबशी किशोरीतार्इंचा वर्षानुवर्षांचा ऋणानुबंध. गतवर्षी म्हणजेच डिसेंबर २०१६ मध्ये देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी त्या कोल्हापुरात आल्या होत्या. हा त्यांचा अखेरचा दौरा ठरला. छत्रपती शाहू साखर कारखाना, देवल क्लब आणि व्हायोलीन अकादमी, पुणे यांच्या वतीने २०१२ साली आयोजित उस्ताद अल्लादिया खाँ संगीत महोत्सवात किशोरीतार्इंना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आम्ही आयुष्यभर सुरांची आराधना केली. सुरांच्या इच्छेनुसार आम्ही गायलो. शास्त्रीय संगीत म्हणजे नोटेशन नव्हे. सूर आपल्या हृदयात यावे लागतात. मग हृदय सुरांकडे येते, तेव्हा शास्त्रीय संगीत तयार होते. आज मात्र संगीताची उपासनाच होत नाही. प्रेक्षकांची अभिरुची ओळखून सुरांना गुलाम केले जाते. त्यामुळे सूर आणि साधकांमध्ये एकमेकांना समजून घेण्याचा धागाच राहिलेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.कोल्हापुरातील यांच्याशी स्नेह कोल्हापुरात आल्या की किशोरीताई आधी त्यांची कुलस्वामिनी श्री अंबाबाईचे दर्शन घ्यायच्या. कितीही व्यस्त कार्यक्रम असला तरी नृसिंहवाडीला जाऊन श्रीदत्तांचे दर्शन हा ठरलेला कार्यक्रम असायचा. पिठलं-भाकरी हा त्यांचा आवडता मेनू. किशोरीतार्इंचा ज्येष्ठ दिवंगत ध्वनिमुद्रक गोपाळ खेर, बाळ घाटगे, श्रीपाल सदावर्ते, व्ही. बी. पाटील यांच्याशी विशेष स्नेह होता. आपल्या शिष्यांना त्या आवर्जून भेटायच्या आणि शास्त्रीय संगीताचे ज्ञान द्यायच्या. पी हळद अन् हो गोरी...!संगीताच्या रिअॅलिटी शोबद्दल त्यांना प्रचंड तिटकारा होता. आम्ही संगीतात कधी महासंग्राम, महागायक, महायुद्ध असे शब्द ऐकले नव्हते. आम्ही ऐकले आणि जगलो ते फक्त सूर आणि त्यांचे विश्व. टी.व्ही.वरील हे कार्यक्रम आणि परीक्षक मुलांना साधनेशिवाय मोठं करतात. शास्त्रीय संगीतातील एकदशांश भागसुद्धा मिळवायची त्यांची तयारी नसते. ‘पी हळद आणि हो गोरी’ असं शास्त्रीय संगीतात होणार नाही, असे त्या कळकळीने म्हणाल्या. कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या रंगमंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी २ जानेवारी २०१६ रोजी उपस्थित असलेल्या किशोरीताई आमोणकर यांना अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अभिनेते नाना पाटेकर उपस्थित होते. किशोरीतार्इंचा हा अखेरचा कोल्हापूर दौरा ठरला. दुसऱ्या छायाचित्रात कोल्हापुरातील देवल क्लबमध्ये एका मैफलीत गायन केल्यानंतर किशोरीतार्इंनी श्रोत्यांना अभिवादन केले. (देवल क्लबच्या संग्रहातील छायाचित्र)
महापालिकेच्या दारी महामार्गांचा हत्ती
By admin | Published: April 05, 2017 12:41 AM