ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - मुंबईला वायफाय सिटी करण्यासाठी रेल्वेपाठोपाठ महापालिकाही पावलं टाकणार आहे़ मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांवर ही सेवा नुकतीच सुरु झाली आहे़ त्या पाठोपाठ आता शाळा, रुग्णालये, अग्निशमन केंद्र आणि पालिकेची विविध कार्यालय वायफाय कनेक्शनने जोडण्यात येणार आहे़ अशी अनुकूलताच प्रशासनाने दर्शविली आहे़ विधी समितीत नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे पालिका रुग्णालये, शाळा आणि अग्निशमन केंद्रांसह पालिकेच्या विविध कार्यालयांत वायफाय कनेक्शन देण्याची मागणी केली होती़ ही सेवा सुरु झाल्यास पालिकेच्या सर्व विभागांची माहिती संगणकात येईल आणि ही माहिती नगरसेवकांसह मुंबईकरांनाही मिळणे सोपे होईल़ यामुळे मुंबईकरांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी पालिका कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले आहे़
या ठरावाच्या सुचनेला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अनुकूलता दर्शविली आहे़ आजच्या घडीला केवळ पालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या दालनात वायफाय सेवा पुरविण्यात आलेली आहे़ याच सल्लागाराचा सल्ला घेऊन पालिका इमारती, शाळा, आरोग्य आणि अग्निशमन केंद्रांतही हा प्रकल्प राबवता येणे शक्य असल्याचा अभिप्राय आयुक्तांनी दिला आहे़ प्रतिनिधी चौकट अशी सुरु होईल वायफाय सेवा पालिका इमारती, शाळा, आरोग्य आणि अग्निशमन केंद्रांतही वायफाय सेवा सुरु करण्यासाठी त्या त्या विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याने प्रस्ताव देणे अपेक्षित आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे़