सदानंद नाईक
उल्हासनगर: ऐन दसरा-दिवाळीच्या सणासमोर नेहरू चौक व कॅम्प नं-४ च्या मुख्य मार्केट मधिल फटाक्यांचे दुकाने महापालिकेच्या रडारवर येऊन, अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी नोटिसा दिल्या. याप्रकारने एकच खळबळ उडाली असून फटाक्यांच्या दुकानावर कारवाईचे संकेत महापालिकेने दिले.
उल्हासनगरात जपानी मार्केट,गजानन मार्केट, फर्निचर मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, गाऊन मार्केट, जीन्स मार्केट, बॅग मार्केट प्रसिद्ध असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक खरेदी करण्यासाठी शहरात येतात. याच बरोबर फटाक्याच्या दुकानाची संख्या लक्षणीय असून शहराबाहेरील शेकडो नागरिक सणासुदीला फटाके व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शहरातील होलसेल फटाक्याच्या दुकानाला येतात. बहुतांश फटाक्यांचे दुकाने ही मुख्य मार्केट व रहिवासी भागात असल्याने, अश्या दुकानावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दिवाळी सणाच्या दरम्यान फटाक्याच्या दुकाना बाहेर उघड्यावर फटाक्यांची विक्री सर्रासपणे होत असल्याने, मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत. मात्र महापालिका प्रशासन व पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका होते.
शहरात ठोक विक्रेत्यांचे फटाके दुकान असल्याने, स्वस्त दरात फटाके मिळतात. त्यामुळे सणासुदीला दुकानात नागरिकांची गर्दी बघायला मिळते. महापालिकेचा कायदा व नियम धाब्यावर बसून दुकानदार दुकाना बाहेर उघड्यावर फटाक्यांची विक्री करीत असल्याने, मोठी घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी फटाक्यांच्या दुकानासह रुग्णलाय, कपडे दुकाने, हॉटेल, लोजिंग आदींच्याकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाण पत्र नसणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला. वर्षानुवर्षे ना हरकत प्रमाणपत्र न घेणाऱ्या एका फट्याक्याच्या दुकानाला शुक्रवारी ५० हजाराचा दंड महापालिकेने ठोठावला. तर दिवाळी सणा दरम्यान सर्रासपणे कायदा व व्यवस्था मोडीत काढून फटाक्यांची विक्री करणाऱ्या दुकानावर कायद्याचा बडगा उगारण्याची मागणी होत आहे .
फटाक्यांच्या गोदामाचा शोध सुरू
नेहरू चौक व कॅम्प नं-४ मधील होलसेल फटाक्याच्या दुकांदारांनाची फटाक्यांची गोदामे, शहरातील रहिवासी क्षेत्रात असल्याची चर्चा आहे. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी फटाक्यांची दुकाने शहरा बाहेर नेण्याची मागणी होत आहे. तसेच फटाक्याच्या दुकानदारांना अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष राजकीय नेते, महापालिका व पोलीस प्रशासन यांचा आशीर्वाद असल्याने, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.